इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
सांगली : सैन्य दलात भरती होऊन देशाची सेवा करावी, असे अनेक तरुणांचे स्वप्न असते. विशेषतः पश्चिम व दक्षिण महाराष्ट्रातील सांगली, सातारा, कोल्हापूर भागातील युवक सैन्य दलात भरती होण्याचे स्वप्न पाहतात, त्यासाठी शाळा व कॉलेजच्या वयापासूनच ते तयारी करतात, मात्र सैन्य दलात भरती झाले नाही तर काही जणांना नैराश्य देखील येते, तरुणांच्या सैन्य दलात भरती होण्याच्या स्वप्नांचा काही जण गैरफायदा देखील घेतात. असाच प्रकार सांगली जिल्ह्यात घडला असून एका भामट्याने सुमारे ४२ तरुणांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक करीत त्यांचे पैसे हडप केल्याच्या प्रकार घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
भामट्याने केली पैशाची लुबाडणूक
तासगाव मधील पांडुरंग कराळे या ४५ वर्षे वयाच्या इसमाने तरुणांच्या सैन्य दलात जाण्याच्या स्वप्नांचा चक्काचूर केला, इतकेच नव्हे तर त्यांना सैन्य दलात भरती करण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून पैशाची मोठ्या प्रमाणावर लुबाडणूक केली. कराळे याने सैन्यदलात भरतीचे आमिष दाखवून युवकांची सुमारे पावणेदोन कोटी रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. मात्र सदर्न कमांडच्या लायझन युनिटने या घटनेचा पर्दाफाश केला आहे. सदर्न कमांडच्या लायझन युनिट आणि कोंढवा पोलिसांनी संयुक्त कारवाई करीत संशयिताला तासगाव येथून अटक केली.
सुमारे दिड वर्षाच्या कालावधी घडला गैरप्रकार
या घटनेत ४२ युवकांनी भरतीसाठी पैसे दिले आहे. फेब्रुवारी २०२२ ते १५ सप्टेंबर २०२३ या सुमारे दीड वर्षाच्या कालावधी हा गैरप्रकार घडला. इच्छुक उमेदवारांकडूनएक कोटी ८० लाख रुपये घेऊन कराळेने घेतले आहे.
कराळेने युवकांकडून लाखो रुपये आणि मूळ कागदपत्रे घेऊन त्यांची फसवणूक केल्याचे पोलीस तपासात उघड झाले. त्यानंतर पोलीसांनी या प्रकरणी कोंढवा पोलिस स्टेशनमध्ये येथे पांडुरंग कराळे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्याला तासगाव येथून अटक करण्यात आली आहे.या प्रकरणात आणखी काही युवकांची फसवणूक झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.