इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
जळगावः बारामतीप्रमाणेच रावेरमध्येही नणंद-भावजयीत लढत होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. भाजपने पुन्हा एकदा रक्षा खडसे यांना तिस-यांदा उमेदवारी दिल्यामुळे राष्ट्रवादीत असलेल्या नणंद रोहिणी खडसे यांना उमेदवारी मिळण्याची चर्चा होती. त्यामुळे बारामती प्रमाणे रावेर लोकसभा मतदार संघातही नणंद- भावजयतीत सामना रंगणार असे बोलले जात असतांना आज माजी मंत्री व राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी स्पष्टीकरण दिले.
खडसे यांनी पत्रकारांना सांगितले की, मी तब्येतीमुळे लोकसभा निवडणूक लढवणार हे अगोदरही सांगितले होते. त्यामुळे आताही मी निवडणूक लढवणार नाही. त्याचप्रमाणे रोहिणी खडसे यांनी कधीही लोकसभा निवडणुकीबाबत विचार केला नाही. त्या विधानसभेसाठी इच्छुक आहे. त्यामुळे खडसे विरुध्द खडसे ही निवडणूक होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
भाजपकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर खा. रक्षा खडसे यांनी आता समोर सासरे असो की नणंद पूर्ण ताकदीने आम्ही मैदानात उतरणार असे सांगितलो होते. पक्षाने माझ्यावर विश्वास दाखवला आहे. मी कुठेही कमी पडणार नाही. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नाथाभाऊ आणि घरातील सर्वांनी मला शुभेच्छा दिल्याचेही त्यांनी म्हटले. पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन यांनी शुभेच्छा दिल्याचेही त्यांनी सांगितले.
भाजपने रावेरमध्ये उमेदवार जाहीर केल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला. महाविकास आघाडीत रावेरची जागा शरद पवार गटाला मिळणार असल्यामुळे रावेर लोकसभा मतदारसंघाबाबत परवा रात्री उशिरापर्यंत शरद पवार,एकनाथ खडसे आणि रोहिणी खडसे यांच्यात चर्चा झाली होती. यावेळी रावेर लोकसभा मतदारसंघात कुणाला उमेदवारी द्यायची यावर मंथन झाले. रक्षा खडसे एकनाथ खडसे यांच्या सून असल्याने महाविकास आघाडीकडून खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांना उमेदवारी देण्याबाबत चर्चा झाल्याचे बोलले जात होते. पण, आता एकनाथ खडसे यांनी स्पष्टीकरण दिल्यामुळे आता राष्ट्रवादीचा उमेदवार कोण असा प्रश्न आता सर्वांना पडला आहे.