नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या रोड शो च्या वेळी चोरट्यांनी तब्बल ३ लाख ६३ हजाराहून अधिकचा ऐवज लंपास केला. हा रोड शो चोरट्यांच्या पथ्यावर पडला. द्वारका ते शालिमार दरम्यान निघालेल्या या रोड शो मध्ये चोरट्यांनी फायदा उचलत अनेकांच्या पाकिट, फोन आणि दागिण्यांवर डल्ला मारला. या घटनेत याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बिल्डींग मटेरियल सप्लायर राजू लक्ष्मण कापसे (रा.म्हाडा कॉलनी,आशिर्वादनगर अंबड लिंकरोड) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. कापसे गुरूवारी (दि.१४) खा. राहूल गांधी यांच्या रोड शो मध्ये सहभागी झाले होते. द्वारका भागातील राधिका हॉटेल समोर अज्ञात भामट्यांनी त्यांच्या खिशातील पाकिटावर डल्ला मारला.
द्वारका ते शालिमार दरम्यान निघालेल्या या रोड शोमध्ये अनेकांना चोरट्यांनी हिसका दाखविला असून तब्बल ३ लाख ६३ हजार ७०० रूपये किमतीचा ऐवज चोरीस गेल्याबाबत भद्रकाली पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. त्यात दागिणे,मोबाईल व रोकडचा समावेश आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक पवार करीत आहेत.