इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नवी दिल्लीः लोकसभा निवडणुकीच्या तारखा आज जाहीर होण्याची शक्यता होती. पण, निवडणुक आयोगाने शनिवारी दुपारी तीन वाजता पत्रकार परिषद ठेवली असून त्यात निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर होणार आहे. देशातील ५४३ लोकसभा मतदार संघातील निवडणुकांच्या कार्यक्रम जाहीर होणार असल्यामुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे.
काल केरळचे ज्ञानेश कुमार आणि पंजाबचे बलविंदर संधू यांची नवीन निवडणूक आयुक्त म्हणून नावे निश्चित झाल्यानंतर निवडणुकीचा कार्यक्रम घोषित करण्याची तयारी सुरु झाली होती. आज घोषणा होण्याची शक्यता होती. पण, निवडणूक आयोगाने आज सोशल मीडियावर पोस्ट टाकत शनिवारी पत्रकार परिषद ३ वाजता असल्याचे सांगितले आहे.
निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झाल्यानंतर देशात आदर्श आचारसंहिता लागू होणार आहे. लोकसभेबरोबरच निवडणूक आयोग जम्मू-काश्मीर, आंध्र प्रदेश, ओडिशा, अरुणाचल प्रदेश या राज्यांतील विधानसभा निवडणुकाही कार्यक्रम जाहीर करणार असल्याचे बोलले जात आहे.
गेल्या लोकसभेप्रमाणेच या निवडणुकाही सात टप्यात होण्याची शक्यता आहे. २०१९ मध्ये ११ एप्रिल, १८ एप्रिल, २३ एप्रिल, २९ एप्रिल, ६ मे, १२ मे आणि १९ मे रोजी मतदान झाले होते. २३ मे रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. गेल्या वेळीही लोकसभेबरोबरच चार राज्याच्या विधानसभा निवडणुका झाल्या होत्या.