मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शिंदे गटाचे विजय शिवतारे यांनी बारामती लोकसभा मतदार संघाची निवडणूक लढवण्याची घोषणा केल्यामुळे अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसची कोंडी झाली आहे. अजित पवार गटाने या प्रकरणी शिंदे यांच्याकडे तक्रार केल्यानंतर शिंदे यांनी शिवतारे यांना तातडीने भेटण्यासाठी बोलावले होते. त्यामुळे आज ते मुंबईला भेटीसाठी गेले. पण, सात तास त्यांना या भेटीसाठी वाट बघावी लागली. त्यानंतर त्यांची मुख्यमंत्री शिंदे यांची भेट झाली.
या भेटीनंतर शिवतारे यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले की, मुख्यमंत्र्याबरोबर सकारत्मक चर्चा झाली. माझ्यासह १५० पदाधिकारी आले होते. आम्ही सर्वांनी मिळून मुख्यमंत्र्यासमोर आमची बाजू मांडली. त्यानंत दोन दिवसानंतर परत एकदा मिटींग होईल. दोन दिवस शांत राहणार आहोत. कारण त्यांना काय कोणाशी काही चर्चा करायची असेल. त्यानंतर परत एकदा मुख्यमंत्र्यांशी मोजक्याच लोकांसह भेटणार असल्याचे शिवतारे यांनी सांगितले.
अजित पवार यांच्या उर्मटपणाला बारामतीची जनता कंटाळली आहे. खा. सुप्रिया सुळे सहजपणे निवडून येतील, असा दावा महायुतीचे नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे माजी आमदार विजय शिवतारे यांनी केला आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महायुती बारामती लोकसभा मतदारसंघात विजय मिळवू शकत नाही, असा दावा त्यांनी केल्यामुळे महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेतील दुरावा आणखी वाढला आहे.
मुख्यमंत्र्याना भेटण्याअगोदर शिवतारे काय बोलले…
मुख्यमंत्र्याना भेटण्याअगोदर शिवतारे यांनी माझ्या भूमिकेत कोणताही बदल होणार नाही. पक्षाने कारवाई केली, तरी आपण निवडणूक लढवणारच असे त्यांनी सांगितले होते. मुख्यमंत्री महायुती असल्यामुळे ते मला समजावून सांगतील. बारामतीतून लढू नका असेही सांगतील; पण मी त्यांना येथील वास्तव समजावून सांगेल. बारामती जिंकण्याचा महायुतीचा हेतू आहे. तो अजित पवार यांच्या माध्यमातून साध्य होणार नाही, हे मी त्यांना पटवून देईल.
अजित पवार यांच्या जाचाला व उर्मटपणाला बारामतीकर कंटाळले असून आम्ही अजित पवार यांना मतदान करणार नाही असे लोकच म्हणत आहेत. पवार विरुद्ध पवार अशी लढत झाली, तरी ताटातले वाटीत आणि वाटीतले ताटात जाणार असल्याचे मतदारांना समजले आहे, असेही ते बोलले होते.