नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गुजरातमधील भरूच येथील मे.शॉफ्ट शिपयार्ड कंपनी येथे बजरंग या तिसऱ्या २५ टी बोलार्ड पुल (बिपी) टग जहाजाचे कमोडोर व्ही. प्रवीण, डब्ल्यूपीएस (एमबीआय)यांच्या हस्ते आज, १४ मार्चरोजी जलावतरण करण्यात आले. केंद्र सरकारच्या मेक इन इंडिया उपक्रमाअंतर्गत, बांधण्यात आलेले हे स्वदेशी जहाज आहे.
केंद्र सरकारच्या “आत्मनिर्भर भारत” उपक्रमाला अनुसरुन मेसर्स शॉफ्ट शिपयार्ड प्रायव्हेट लिमिटेड (M/s SSPL), या एमएसएमई क्षेत्रातील कंपनीशी करण्यात आलेला एकूण तीन २५ टी बोलार्ड पुल (बिपी) टग जहाजांची बांधणी तसेच वितरण संदर्भातील करार संपला आहे. या जहाजांची बांधणी भारतीय जहाजबांधणी प्रबंधनाच्या (आयआरएस) वर्गीकरण नियमांतर्गत करण्यात आली आहे.
या प्रकारच्या जहाजांच्या उपलब्धतेमुळे, नौदलाच्या जहाजांना तसेच पाणबुड्यांना बर्थिंग तसेच अन-बर्थिंग, त्यांना वळवणे, मर्यादित पाण्यात फिरणे यासाठी मदत होईल आणि त्यायोगे भारतीय नौदलाच्या परिचालनविषयक वचनबद्धतेला चालना मिळेल. पाण्यात असताना तसेच नांगर टाकलेला असताना आजूबाजूच्या जहाजांना हे जहाज अग्निशमन यंत्रणेची मदत पुरवू शकेल तसेच मर्यादित स्वरूपाच्या शोधमोहीमा तसेच बचाव कार्य यांच्यात देखील भाग घेऊ शकेल.