नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भाषा हे खरं तर संवादाचे आणि शिक्षणाचे माध्यम आहे त्याचा उपयोग बौद्धिक, मानसिक, वाचिक क्षमता वाढविण्यासाठी करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन विद्यापीठाचे कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल डॉ. माधुरी कानिटकर (निवृत्त) प.वि.से.प., अ.वि.से.प., वि.से.प. यांनी केले. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात ’कुसुमाग्रज स्मरण यात्रा’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मा. कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) प.वि.से.प., अ.वि.से.प, वि.से.प., समवेत मा. प्रति-कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ, कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ, परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) यांनी अध्यक्षीय मनोगतात सांगितले की, मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन होणे गरजेचे आहे. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी काम करण्याची माझी मोठी इच्छा आहे आणि सुदैवाने मी कुसुमाग्रजांच्या कर्मभूमीत राहत आहे याचा मला अभिमान वाटतो. आपण मराठी साहित्याकडे अधिक लक्ष दिले पाहिजे. विज्ञान कितीही पुढे गेले तरी समाजाला एकत्र ठेवणारी संस्कृतीच असते असे त्यांनी सांगितले.
विद्यापीठाचे मा. प्रति-कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ यांनी सांगितले की, प्रत्येक प्रांतानुसार मराठी भाषेचा लय बदलतो मात्र भाषेचा गोडवा कायम राहतो. मराठी ही सर्व भाषा सर्व बाजूंनी समृध्द आहे तिचा वापर मोठया प्रमाणात होणे गरजेचे आहे. संगणक आणि मोबाईलचा अतिवापरामुळे भाषेवर परिणाम होत आहे यासाठी वाचन संस्कृती जोपासणे गरजेचे आहे. यासाठी भाषेचे संवर्धन करूया. भाषेची अस्मिता जागृत ठेवण्यासाठी स्पर्धा व कार्यक्रमाच्या माध्यमातुन जनजागृती करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ यांनी सांगितले की, मराठी भाषेला आपण प्राधान्य दिले पाहिजे. मराठी भाषेचा प्रसशासकीय कामात वापर वाढणे आवश्यक आहे. भाषेची समृध्दता जपण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू यांनी सांगितले की, मानवी संवेदना काव्यातून, ग्रंथांतून, आणि भाषणातून व्यक्त करण्यासाठी भाषा हे महत्वाचे माध्यम आहे. बालवयात मुलांना भाषेची जाण करुन देणे गरजेचे आहे. यासाठी मराठी पुस्तकांचे वाचन करावे. पुस्तक वाचनातून साहित्याची आवड निर्माण होते. भाषा समृध्द होण्यासाठी त्यास बळकटी मिळते असे त्यांनी सांगितले.
या अनुषंगाने विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी यांच्या सहभागातून कुसुमाग्रज स्मरण यात्रा’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते जेष्ठ कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.या कार्यक्रमाचे समन्वयन व सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांनी केले. या कार्यक्रमात श्री. उल्हास कुलकर्णी, श्रीमती सविता पाटील, श्री. अजित डेरे यंानी कवी कुसुमाग्रज यांच्या साहित्यातील काव्यांचे सादरीकरण केले. या कार्यक्रमास विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.