इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
अहमदनगरः लोकसभा निवडणुकीत या पक्षातील नेत्यांचे पक्षांतर सर्वत्र सुरु आहे. राज्यातही मोठ मोठे नेते या स्वपक्षातून दुस-या पक्षात जातांना दिसत आहे. त्यामुळे काहींना बळ तर काहींचे नुकसान होत आहे. राज्यात सत्तेत आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही या लोकसभेत आज पहिला धक्का बसला आहे. त्यांच्या गटाचे आमदार नीलेश लंके आज शरद पवारांबरोबर गेले. त्यांनी अधिकृत प्रवेशाची घोषणा केली नसली तरी त्यांनी अप्रत्यक्षपणे संकेत दिले.
कोव्हिड काळातील लंके यांना आलेल्या अनुभवावर आधारित मी अनुभवलेला कोव्हिड या पुस्तकाचे अनावरण शरद पवार यांच्या हस्ते झाले. त्यासाठी ते शरद पवारांबरोबर होते. त्यानंतर झालेल्या पत्रकारांच्या प्रश्नांनी त्यांनी थेट प्रवेशाबाबत उत्तर दिले नाही. पण, पवार सोहब सांगतील तो आदेश मान्य असे सांगून संकेत दिले.
अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची भाजपची उमेदवारी खा. सुजय विखे यांना जाहीर झाल्यांनतर त्यांच्या विरोधात रणांगणात उतरण्यासाठी आमदार लंके हे शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. लोकसभेची निवडणूक लढवण्यास ते इच्छुक आहेत. भाजपच्या उमेदवारांची यादी जाहीर होताच, ते आज शरद पवारांबरोबर दिसले.
शरद पवार गटाकडून त्यांना अहमदनगर दक्षिण लोकसभा निवडणुकीत उमेदवारी मिळू शकते. भाजपने अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून सुजय विखे यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिल्याने महायुतीत लंके यांना संधी मिळणार नसल्याचे स्पष्ट झाल्याने शरद पवार गटात प्रवेश करून आ. लंके अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून रिंगणात उतरणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे.