इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
अहमदनगरः लोकसभा निवडणुकीत या पक्षातील नेत्यांचे पक्षांतर सर्वत्र सुरु आहे. राज्यातही मोठ मोठे नेते या स्वपक्षातून दुस-या पक्षात जातांना दिसत आहे. त्यामुळे काहींना बळ तर काहींचे नुकसान होत आहे. राज्यात सत्तेत आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही या लोकसभेत आज पहिला धक्का बसणार आहे. त्यांच्या गटाचे आमदार नीलेश लंके आज सायंकाळी चार वाजता शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार आहेत.
अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची भाजपची उमेदवारी खा. सुजय विखे यांना जाहीर झाल्यांनतर त्यांच्या विरोधात रणांगणात उतरण्यासाठी आमदार लंके हे शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. लोकसभेची निवडणूक लढवण्यास ते इच्छुक आहेत. भाजपच्या उमेदवारांची यादी जाहीर होताच, त्यांनी हा निर्णय घेतला आहे. दोन दिवसांपूर्वीचे त्यांचे वक्तव्य तळ्यात मळ्यात असल्याचे होते.
आज या प्रवेशासोबतच त्यांना अहमदनगर दक्षिण लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाची उमेदवारी मिळू शकते. भाजपने अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून सुजय विखे यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिल्याने महायुतीत लंके यांना संधी मिळणार नसल्याचे स्पष्ट झाल्याने शरद पवार गटात प्रवेश करून आ. लंके अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून रिंगणात उतरणार आहेत.