धुळे (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- राहुल यांची ‘भारत जोडो न्याय यात्रा’ बुधवारी धुळे जिल्ह्यात दाखल झाली. दोंडाईचा येथे त्यांची भव्य रॅली आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर ते धुळे शहरात आले. धुळे शहरात आयोजित महिला मेळाव्यात त्यांनी मोदी सरकारवर टीका केली. त्यानंतर त्यांचा मालेगाव येथे रोड शो झाला.
धुळ्यात आयोजित महिला मेळाव्यात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी महिलांसाठी पाच मोठ्या घोषणा केल्या. त्यात महिलांच्या खात्यात एक लाख रुपये आणि सरकारी नोकऱ्यांत महिलांना पन्नास टक्के आरक्षणाच्या घोषणेचा समावेश आहे.ते म्हणाले, की मोदी यांनी महिला आरक्षण दिले. फटाके फोडले नाचले आणि सर्वे पूर्ण झाल्यावर आरक्षण मिळणार आहे. त्यासाठी पाच वर्षे वाट पाहावी लागणार आहे.
काँग्रेसचे सरकार आल्यावर आम्ही लगेच आरक्षण देऊ. कोणत्याही सर्वेक्षणाची त्यासाठी आवश्यकता नाही. सगळ्या गरीब महिलांच्या खात्यात एक लाख रुपये जमा करू. सरकारी नोकरीमध्ये महिलांना ५० टक्के आरक्षण देऊ. आशा अंगणवाडीमध्ये काम करणाऱ्या महिलांना केंद्र सरकारची भागीदारी दुप्पट करू. सावित्रीबाई फुले यांच्या नावाने नोकरी करणाऱ्या महिलांसाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह सुरू करू.