माणिकराव खुळे, हवामानतज्ञ
तापमान वाढीचे स्वरूप, महाराष्ट्रात पावसाची शक्यता, पीक काढणीतील महिन्यात अवकाळी वातावरण या वाचकांच्या प्रश्नांवर हवामानतज्ञ माणिकराव खुळे यांनी दिलेली ही उत्तरे…
दोन दिवसानंतर तापमान वाढीचे स्वरूप कसे असु शकते?
पश्चिम झंजावाताच्या साखळ्या खंडीत होण्याच्या शक्यतेमुळे ६ महिने त्यांच्यामुळे संपूर्ण उत्तर भारतात अनुभवलेला पाऊस, तीव्र, हिमवृष्टी व थंडीचा कालावधी तेथे संपुष्टात येण्याची शक्यता निसर्ग कालचक्राप्रमाणे आता निर्माण होत आहे.परिणामी परवा,शुक्रवार दि.१५ मार्चपासून महाराष्ट्रातही थंडी कमी होवून कमाल व किमान अश्या दोन्हीही तापमानात सरासरीपेक्षा २ डिग्री से. ग्रेडने वाढ होईल.
(अर्थात एप्रिल ते जून ह्या पूर्वमोसमी तीन महिन्यातही कमकुवत प. झंजावात कधी-कधी डोकावतातही.)
येत्या चार दिवसानंतर महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे काय?
शेतीचा रब्बी पिकांच्या काढणीच्या गंभीर अवस्थेतील कालावधी सध्या चालु आहे. त्यातही महाराष्ट्रात ‘ पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता म्हणून बातमी शेतकऱ्यांच्या कानी येऊ शकते. मात्र शेतकऱ्यांनी विचलित होवु नये, असेच वाटते. कारण आजपासुन चार दिवसानंतर विदर्भातील केवळ अमरावती नागपूर गोंदिया व गडचिरोली अश्या ४ जिल्ह्यात १६ ते १९ मार्च(शनिवार ते मंगळवार)दरम्यान अश्या ४ दिवसात केवळ ढगाळ वातावरण राहून अगदीच तुरळक ठिकाणी नकळत किरकोळ अवकाळी पावसाची शक्यता जाणवते. तेंव्हा उर्वरित कोकण, मध्य महाराष्ट्र मराठवाडा व विदर्भातील ३२ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी घाबरू नये. तेथे वातावरण कोरडेच राहील, असे वाटते.
एकंदरीत सध्याच्या पीक काढणीतील महिन्यात अवकाळी वातावरण कसे असेल?
-अवकाळी पाऊस व गारपीटीच्या हंगामाचा कालावधी अजूनही संपलेला नाही. परंतु (i)खंडीत होत जाणाऱ्या प. झंजावाताच्या साखळ्या अन (ii)एल- निनोचे वर्ष व (iii) मार्चच्या मासिक सरासरीइतकी किंवा मध्यम पर्जन्याची शक्यता, ह्यामुळे महाराष्ट्रात अवकाळी पाऊस व गारपीटीची विशेष अशी शक्यता सध्याच्या व येणाऱ्या रब्बी पीक काढणीच्या काळात जाणवणार नाही, असेच वाटते.त्यामुळे फळबागा, कांदा, गहू, हरबरा, ज्वारी सारख्या रब्बी पिकांचा काढणी हंगाम सुरक्षित व निर्धास्तपणे उरकता येईल असे वाटते. अर्थात वातावरणात एकाकी बदलाची काही शक्यता असल्यास अवगत केले जाईलच.
माणिकराव खुळे
Meteorologist (Retd)
IMD Pune.