शिवसेना, सत्कार्य फाउंडेशनच्या शिष्टमंडळाने घेतली महापालिका आयुक्तांची भेट
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- गोविंदनगर येथील जॉगिंग ट्रॅकची दुरुस्ती करावी, तेथील अनधिकृत बांधकामे हटवावीत, रस्ते दुरुस्ती करून गतिरोधक बसवावेत, पावसाळी गटारींचे काम करावे, यासह विविध मागण्यांसाठी बुधवारी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष व सत्कार्य फाउंडेशनच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त अशोक करंजकर यांची भेट घेतली. आवश्यक सुविधाच मिळणार नसतील तर घरपट्टी, पाणीपट्टी भरायची का याचा विचार करावा लागेल, असा इशाराच शिष्टमंडळाने यावेळी दिला.
गोविंदनगर, कर्मयोगीनगर, तिडकेनगर, कालिका पार्कसह प्रभाग क्रमांक २४ मधील विविध समस्या सोडविण्यासाठी बुधवारी सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष, शिवसैनिक बाबासाहेब गायकवाड (देशमुख) यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त अशोक करंजकर यांची भेट घेतली. त्यांना निवेदन सादर केले. नयनतारा इमारतीजवळील दुभाजक काढून भुजबळ फार्मकडे जाण्यासाठी रस्ता करावा. रस्त्यावरील हातगाड्यांची अतिक्रमणे हटवावीत. गॅस पाईपलाईनसाठी खोदून ठेवलेल्या रस्त्यांची त्वरित दुरुस्ती करावी. शिवसेना, सत्कार्य फाउंडेशनच्या मागणीने व पाठपुराव्याने प्रभाग २४ मध्ये मंजूर झालेल्या गतिरोधकांचे काम त्वरित सुरू करावे. दूषित, कमी दाबाचा, अवेळी पाणी पुरवठा होत असून तो स्वच्छ व सुरळीत करावा. कर्मयोगीनगर, गोविंदनगर येथील सभागृहात रुग्णालये सुरू करणे रद्द करून हे सभागृह नागरिकांसाठी खुले करावेत. आर डी सर्कल ते बाजीरावनगर हा रस्ता २४ मीटर रूंद करावा आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. बांधकाम विभागाशी संबंधित समस्या सोडविण्याच्या सूचना शहर अभियंता नितीन वंजारी, कार्यकारी अभियंता नितीन पाटोळे यांना आयुक्तांनी दिल्या. इतर समस्या सोडविण्यासाठी संबंधित विभागांना सूचना देवून या भागात लवकरच पाहणी करू, असे आश्वासन दिले.
यावेळी बाबासाहेब गायकवाड (देशमुख), नयना गावीत, दौलत ढोमसे, राजेंद्र वडनेरे, रवी मूल, राहुल जैन, जगन पवार, वाय. पी. पाटील, एच. के. धांडे, दत्ता दळवी, आर. एन. आहेर, व्ही. डी. पाटील, ए. एम. मोरे, प्रसाद गुळवे, जी. एम. सोनवणे, आर. व्ही. सुकेणकर, सुभाष बडगुजर, व्ही. के. सोनवणे, पी. व्ही. पाटील, संजय पाटील, एस. एन. जाधव, अमित पवार, विश्राम पाटील, आबा पाटील आदींसह रहिवाशी उपस्थित होते.