पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- भारतीय सैन्यात आर्मी अग्निवीर व नियमित भरतीसाठी १३ फेब्रुवारी रोजी www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर अधिसूचना अपलोड करण्यात आली असून इच्छुक उमेदवारांनी संकेतस्थळावर २२ मार्चपर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने केले आहे.
या भरती प्रक्रियेत अग्निवीर जी.डी., अग्निवीर तंत्रज्ञ, अग्निवीर कार्यालय सहाय्यक, १० वी व ८ वी उत्तीर्णांसाठी अग्निवीर ट्रेड्समॅन, अग्निवीर महिला सैनिकी पोलिस यांचा तसेच नर्सिंग असिस्टंट/शिपाई फार्मासाठी नियमित भरतीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पहिल्या टप्प्यात उमेदवारांना संगणक आधारित ऑनलाइन परीक्षेला उपस्थित राहणे आवश्यक आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संकेतस्थळावरील अधिसूचना तपशीलवार वाचावी. विषय अधिसूचनेनुसार एनसीसी उमेदवार, तांत्रिकदृष्ट्या पात्र व्यक्ती, उत्कृष्ट खेळाडू आणि माजी सैनिकांच्या मुलांना बोनस गुण आणि शारीरिक मोजमापातील सूट दिली जाईल. याबाबतचा तपशिल अधिसूचनेत दिलेले आहेत.
लेखी परीक्षेत निवडलेल्या उमेदवारांना संबंधित सैन्य भरती कार्यालयाद्वारे भरती मेळाव्याला उपस्थित राहण्यासाठी बोलावले जाईल. उमेदवारांच्या वैद्यकीय चाचणीपूर्वी त्यांना अनुकूलता चाचणीला सामोरे जावे लागेल. या चाचणीचा भरती प्रक्रियेत प्रथमच समावेश केला आहे. अनुकूलता चाचणीसाठी उमेदवारांनी रॅलीच्या ठिकाणी पुरेशी बॅटरी लाइफ आणि २ जीबी डेटा असलेला कार्यरत स्मार्टफोन आणणे आवश्यक आहे, असेही जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल हंगे स.दै. (नि.) यांनी कळविले आहे.