नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– नाशिकरोड परिसरात गुटख्याचा साठा बाळगणा-या दोघांना पोलीसांनी बेड्या ठोकल्या. संशयिताच्या तांच्या ताब्यातून सुमारे ९० हजार रूपये किमतीचा प्रतिबंधीत सुगंधी तंबाखू व सुपारी हस्तगत करण्यात आली असून याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अजीज रशिद शेख (रा.मनमाड ता.नांदगाव) व मोहम्मद अली मोहम्मद कासिम (रा.टॉयटॅनिक बिल्डींग गोसावीवाडी) अशी पोलीसांनी कारवाई केलेल्या संशयितांची नावे आहेत. नाशिकरोड रेल्वेस्थानक परिसरातील बंद पडलेल्या पेट्रोल पंप परिसरात उभ्या असलेल्या दोघांकडे प्रतिबंधीत गुटख्याचा साठा असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार मंगळवारी (दि.१२) पथकाने धाव घेतली असता गुटख्याचा साठा पोलीसांच्या हाती लागला.
पथकाने दोघांच्या अंगझडतीसह सोबत असलेल्या प्लॅस्टीक गोणीची तपासणी केली असता त्यात प्रतिबंधीत विमल पान मसाला व सुगंधी तंबाखूचे पुडे आढळून आले. सदरचा साठा मानवी आरोग्यास अपायकारक असल्याने राज्यात विक्री,उत्पादन आणि वाहतूक करण्यावर बंद आही. असे असतांना संशयित सदरचा साठा विक्री करण्याच्या उद्देशाने कब्जात बाळगतांना मिळून आले. याबाबत पोलीस शिपाई सागर आडणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस दप्तरी गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक काळे करीत आहेत.