इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
अहमदाबादमध्ये नरेंद्र मोदी मैदानावर जवळपास सव्वा लाख प्रेक्षकांच्या उपस्थितीत आज भारतीय संघाने परंपरागत शत्रूत्वाचा इतिहास कायम राखत पाकिस्तानचा ७ विकेटसने (अवघ्या ३०.३ षटकात) अतिशय लाजिरवाणा पराभव केला. विश्वचषक स्पर्धेत आत्तापर्यन्त दोघांमध्ये झालेल्या ‘७’ सामन्यात पाकिस्तानला एकही सामना जिंकता आलेला नव्हता. आता त्यांच्या विक्रमी पराभवाचा हाच डोंगर आणखी एका संख्येने मोठा झाला आहे. या विजयानंतर भारतीय संघ गुणाच्या टेबलमध्ये पाहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे.
पाकिस्तानच्या १९१ या अतिशय माफक धावसंख्येला उत्तर देण्यासाठी रोहित शर्मा आणि शुभमन गिल ही सलामीची जोडी मैदानात उतरली होती. शुभमनने आल्या आल्या आपल्या बॅटचे पातेही उघडले होते. परंतु, तो जास्त वेळ मैदानावर टिकू शकला नाही आणि १६ धावा करुन बाद झाला. आजच्या सामन्यात ईशान किशन ऐवजी डेंग्यूतून बरा होऊन आलेल्या आणि प्रचंड फार्मात असलेल्या शुभमन गिलला संघात संधी देण्यात आली होती. शुभमनच्या जागेवर आलेल्या विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यात एक चांगली पार्टनरशिप आकार घेवू लागली होती. परंतु, विराट (१६ धावा) खेळपट्टीवर फार काळ तग धरु शकला नाही. दुसऱ्या बाजूने कर्णधार रोहित शर्मा याने मात्र सामन्याची सगळी सूत्र हातात घेतली होती.
शाहीन आफ्रीदी असेल, हसन अली असेल किंवा हरीस रऊफ आणि मोहम्मद नवाझ असेल, रोहितने कुणालाच दया माया दाखवली नाही. पाकिस्तानी गोलंदाजांना त्याने आज केवळ फोडूनच काढले नाही तर त्यांची सगळी लय बिघडवून टाकण्यात तो यशस्वी ठरला. या स्पर्धेच्या सुरुवातीला पहिल्याच सामन्यात रोहित शर्मा शून्य या धावसंख्येवर बाद झाला होता. परंतु त्यानंतर अफगाणिस्तान विरुद्ध १३१ धावा आणि आज पाकिस्तान विरुद्ध ८६ धावा करून, आपणच विश्वचषक स्पर्धेचे हिटमॕन आहोत हे शाबीत केले. रोहितने आज ६ चौकार आणि ६ षटकार खेचले. त्यानंतर संघात आपले स्थान बळकट करण्याच्या प्रयत्नात असलेल्या श्रेयस अय्यरने नाबाद ५३ धावा करुन भारतासाठी विजयाचा मार्ग मोकळा करुन दिला.
‘महासंग्राम’ म्हणून विश्वचषकाच्या ज्या सामन्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु होती त्या भारत विरुध्द पाकिस्तान सामन्याच्या पहिल्या डावात पाकिस्तानने विजयासाठी भारताला ५० षटकात आवघ्या १९२ धावा करण्याचे आव्हान दिले होते. पाकिस्तानचा संपूर्ण डाव अवघ्या ४२.५ षटकात संपला होता. भारताचा कर्णधार रोहित शर्माने टॅास जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार रोहितचा मुड आज वेगळाच होता. या ‘हाय व्होल्टेज’ सामन्यात पहिले पाकिस्तानला कमी धावात रोखायचे आणि नंतर जे काही आव्हान मिळेल त्या धावसंख्येचा पाठलाग सहजपणे करायचा हा रोहितचा ‘मास्टर प्लॅन होता. हा प्लॅन रोहितच्याच नेतृत्वाने यशस्वीपणे पुर्ण देखील केला.
पहिल्या डावात भारतीय गोलंदाजापैकी मोहम्मद सिराजला आज त्याच्या पहिल्या षटकापासून चांगलाच मार पडला. परंतु, महत्वाच्या विकेटस् देखील त्यालाच मिळाल्या. सलामीचा फलंदाज अब्दुल्ला शफिक (२०) आणि कर्णधार बाबर आझम (५०) हे त्याला पहिल्या दोन स्पेलमध्ये मिळालेले २ बळी ठरले. दुसरीकडून कुलदीप यादवने तर कमालच केली. त्याने एकाच ओव्हर मध्ये सऊद शकील (६) आणि इफ्तिखार अहमद (४) हे स्वस्तातले बळी घेतले. कुलदीप-जाडेजा या फिरकी जोडीने आज पाकिस्तानच्या धावांवर असा काही अंकुश ठेवला की, सुरुवातीला ३०० च्या पुढे धावसंख्या दर्शविणा-या ‘प्रेडीक्टर’चा आलेख त्यानंतर सपाट्याने खाली येत गेला.
या संधीचेच औचित्य साधून कुलदीप यादवने २ आणि बुमराहने त्याच्या दुसऱ्या स्पेलमध्ये २ बळी घेवून पाकिस्तानी संघाचे कंबरडे पुरते मोडले. पत्याचा बंगला कोसळून पडावा तसा पाकिस्तानचा डाव ४२.५ षटकात सर्वबाद १९१ धावांवर कोसळला. या सामन्यात एक वेळ अशी आली होती की कर्णधार बाबर आझम आणि पाकिस्तानचा मुख्य फलंदाज मोहम्मद रिझवान या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ८२ धावांची मजबूत भागीदारी केली होती. त्यामुळे १५५ वर तिसरी विकेट पडल्यानंतर १९१ धावसंख्येत पाकिस्तानचा सगळा संघ गुंडाळण्यात भारतीय गोलंदाजांनी कसब दाखवले. या डावाचे वैशिष्ट्य म्हणजे जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, हार्दिक पांड्या, कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा या सर्व गोलंदाजांनी प्रत्येकी दोन बळी घेवून सांघिक खेळाचा उत्कृष्ट नमुना पेशकेला आहे.
उद्या इंग्लंड आणि अफगाणिस्तान यांच्यात दिल्ली येथे सामना खेळला जाईल.