नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दिंडोरी लोकसभा मतदार संघातून पवार गटाचा, तर नाशिक लोकसभा मतदार संघातून ठाकरे गटाचा उमेदवार असेल, अशी माहिती शरद पवार यांनी दिली. पवार म्हणले, की जागावाटपाचे काम जवळजवळ संपले आहे. लवकरच अंतिम निर्णय होईल. राज्यात शेतकरी सत्ताधारी पक्षावर नाराज असून राज्यातील वातावरण महाविकास आघाडीला अनुकूल आहे. नाशिक, धुळे, सातारा, पुणे आदी कांदा उत्पादक जिल्ह्यामध्ये सरकारच्या विरोधात मोठी नाराजी आहे. ऊस आणि इथेनॉल निर्मितीबाबत केंद्र सरकारचे धोरण योग्य नसल्याने ऊस उत्पादक शेतकरीदेखील सरकारवर नाराज आहेत.
यावेळी ते म्हणाले की, एकीकडे शेतकरी वर्ग नाराज आहे तर दुसरीकडे बेरोजगारी आणि महागाई यामुळे सर्वसामान्य नागरिक अस्वस्थ आहे. या सर्वाची किंमत सत्ताधारी पक्षाला मोजावी लागणार आहे. ‘ईडी’, ‘सीबीआय’ अशा तपास संस्थांचा वापर विरोधकांना अडकवण्यासाठी केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. या कारवाई विरोधात जेव्हा विरोधक न्यायालयात जातो, तेव्हा न्यायालयाचा निकाल हा सरकारच्या विरोधात जात असल्याचेही ते म्हणाले…
ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्याबाबत ते म्हणाले की, महाविकास आघाडी सोबत सहभागी करून घेण्याचा आमचा प्रयत्न असून, लोकसभा निवडणुकीला वेळ कमी असल्यामुळे आम्ही तयारीला लागलो असल्याची माहिती शरद पवार यांनी दिली.