नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बाबाची गादी बनवण्यासाठी बिबट्याला ॲक्सिलेटर केबलने गळा आवळून ठार मारल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इगतपुरी वनपरिक्षेत्राच्या हद्दीतील एका डोंगरावर पाण्याच्या डोहाजवळ रात्रीच्यावेळी तहान भागविण्यासाठी आलेल्या बिबट्याचा कातडीसाठी जीव घेण्यात आला आहे. या घटनेत ग्रामिण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून पाच जणांच्या टोळीला शिताफीने बुधवारी गजाआड केले आहे.
या घटनेबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, संशयित आरोपी संन्यासी दिलीप बाबा याला बाबागिरी करण्यासाठी गादी बनवायची होती. या गादीला बिबट्याचे कातडे लावायचे होते, यासाठी त्याने मुख्य शिकारी आरोपी नामदेव दामू पिंगळे याला त्याचा साथीदार संशयित सतोष जाखीरेमार्फत ‘सुपारी’ दिली. यानंतर आरोपी नामदेव पिंगळे (३०,रा.पिंपळगाव मोर), संतोष जाखीरे (४०,रा.मोगरा), रविंद्र अघाण (२७,रा.खैरगाव), बहिरू उर्फ भाऊसाहेब बेंडकोळी (५०,रा.वाघ्याची वाडी) आणि बाळु धोंडगे (३०,रा.धोंडगेवाडी) या सर्वांनी मिळून बिबट्याची कातडी काढल्याचे पोलिसांच्या तपासात पुढे आले आहे.
ही कातडी काढल्यानंतर ती कातडी वाळवायला ठेवून संशयित दिलीप बाबा याला ती विक्रीसाठी बुधवारी घेऊन जाणार होते. या बाबाचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. या गुन्ह्याचा तपास व आरोपींना आता पुढे नाशिक पश्चिम वनविभागाच्या इगतपुरी वनपरिक्षेत्राच्या हवाली करण्यात आले आहे.