नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहरात वेगवेगळया भागातून तीन दुचाकी चोरीला गेल्याच्या घटना घडल्या. म्हसरूळ,मुंबईनाका व गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.
पहिली घटना गंगापूररोड भागात घडली. सुनिल सुकदेव ठोंबरे (रा.कृष्णबन कॉलनी,भुजबळ फार्म जवळ) हा युवक रविवारी गंगापूररोड भागात गेला होता. शहिद सर्कल ते मॉडर्न चौक दरम्यानच्या प्रौढ नागरीक सभागृहाबाहेर त्याने आपली अॅक्टीव्हा एमएच १५ जेपी ७६३५ पार्क केली असता चोरट्यांनी ती चोरून नेली. याबाबत गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार पगार करीत आहेत.
दुस-या घटनेत दिंडोरीरोड भागातील संजय रामकृष्ण कराटे (रा.कस्तुरीगंध सोसा.प्रभातनगर) यांची शाईन दुचाकी एमएच १५ जीटी ६२६४ सोमवारी (दि.११) रात्री त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेली असतांना ती चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार भोये करीत आहेत.
तिसरी घटना मुंबईनाका भागात घडली. सलिम बशिर शेख (रा.औरंगाबाद नाका) हे रविवारी (दि.१०) मुंबईनाका भागात गेले होते. अरिहंत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या पार्किंगमध्ये त्यांनी आपली सीडी डिलक्स दुचाकी पार्क केली असता ती चोरट्यांनी पळवून नेली. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस नाईक भगवान भोये करीत आहेत.