इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या सभेनंतर ट्विट केलेली पोस्ट चांगलीच चर्चेत आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, अत्यंत पोटतिडकीने मराठा आरक्षणाचा प्रश्न मांडणाऱ्या मनोज जरांगे-पाटलांनी आज लाखोंचा समाज आरक्षणासाठी एक करून दाखवला. त्यांच्या या ऐतिहासिक सभेची दखल घेण्याऐवजी पेड ट्रोलर्सच्या माध्यमातून खोट्या तक्रारी करून जरांगे-पाटलांचे Facebook पेज बंद करणे, सभेच्या भागात नेटवर्क बंद करणे, आपल्या प्याद्यांच्या मार्फत जरांगे पाटलांवर आरोप करणे हे महाराष्ट्राच्या सत्ताधाऱ्यांना शोभणारं नाही. काहीही करून आरक्षणाच्या मार्गात अडथळे आणण्यापेक्षा आपण सर्वजण सोबत आहोत हा विश्वास सरकारने मराठा समाजाला द्यावा असे ट्विट राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केले आहे.
त्यांची ही पोस्ट सध्या चर्चेत आहे. मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या जालनातील अंतरवाली येथील जाहीर सभेला तुफान गर्दी झाली. या गर्दीने उच्चांक मोडला आहे. या सभेला ११ वाजेपासून सुरुवात झाली. याच सभेनंतर रोहित पवार यांनी ही पोस्ट केली. त्यात त्यांनी सरकारवर टीका केली आहे. पेड ट्रोलर्सवरही हल्लाबोल केला आहे.
जरांगे पाटील काय म्हणाले होते.
कोण म्हणते मराठा एक होत नाही…या सभेच्या गर्दीने उत्तर दिले, आरक्षणावर सर्व्हेक्षण झाले नाही, ५० टक्केच्या वर आरक्षण घेणार नाही, ५० टक्के आतील आरक्षण हवे. सरकारला ४० दिवस दिले होते. आम्ही एक शब्दही सरकारला विचारले नाही. आता हातात १० दिवस आहे. या दहा दिवसात आरक्षण द्या, नाही दिले तर ४० व्या दिवशी सांगू असे ते म्हणाले. २२ ऑक्टोंबरला पुढच्या आंदोलनाची दिशा ठरणार असेही मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.