इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नाशिक लोकसभा मतदार संघातून खा. हेमंत गोडसे यांनाच उमेदवारी मिळणार असल्याचे खा. श्रीकांत शिंदे यांनी काल जाहीर केल्यानंतर या जागेसाठी इच्छुक असलेल्या शांतिगिरी महाराज नाराज झाले. आता त्यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याची तयारी सुरु केली आहे. तर दुसरीकडे बाबाजी भक्तगण परिवारातून महाविकास आघाडीकडून मोर्चेबांधणी करण्यात येत आहे.
शांतिगिरी महाराज यांना महायुतीकडून तिकीट मिळण्याची अपेक्षा होती. त्यासाठी भाजपने शिवसेनेला त्यांचे नावही सुचवले होते. त्यानंतर महाराजांनी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. पण, काल मुख्यमंत्रीच्या चिरंजीवांनी घोषणा केल्यानंतर शांतिगिरी महाराज यांनी नाराजी व्यक्त केली. पण, लोकसभा निवडणूक लढवायचीच असा ठाम निर्धार केला.
शांतिगिरी महाराजांनी २००९ मध्ये छत्रपती संभाजीनगर मतदार संघातून निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांना १ लाख ४८ हजारं मते मिळाली होती. पण, या पराभवानंतर ते राजकारणापासून लांब राहिले. त्यानंतर त्यांनी आता पुन्हा नाशिकमध्ये लढण्याची तयारी सुरु केली आहे. नाशिक जिल्ह्यातील लाखलगाव हे शांतिगिरी महाराजाचे मुळ गाव आहे. त्यामुळे त्यांनी नाशिक लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय़ घेतला.
शांतिगिरी महाराजांचे छत्रपती संभाजीनगर, जालना, अहमदनगर, नाशिक, धुळे या जिल्ह्यात मोठा भक्त परिवार आहे. वेरुळे येथीलजनार्धन स्वामी मठाचे ते मठाधिपती आहे. या मठाची कोट्यवधींची संपत्ती आहे. देशात ५५ हून अधिक मठ आहे. त्यांनी विज्ञान शाखेतून पदवी घेतली. त्यामुळे धर्मनगरी असलेल्या नाशिकमध्ये त्यांच्या उमेदवारीमुळे राजकारणात चांगलीच चर्चा सुरु झाली आहे.