पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढवण्याची घोषणा केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार गटाने त्याला प्रत्त्युतर दिले होते. त्यानंतर आता विजय शिवतारे यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता बारामती लोकसभा मतदार संघात तिरंगी लढत होणार आहे.
काल अजित पवार गटाचे नेते आनंद परांजपे यांनी मुख्यमंत्र्यांनी आपल्या नेत्यांना आवरले नाही, तर कल्याण लोकसभा मतदारसंघात वेगळा निकाल लागेल असे सांगत इशारा दिला होता. मुख्यमंत्री शिंदे यांचे चिरंजीव डॉ. श्रीकांत कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार असल्यामुळे त्यांच्या या इशा-याची चांगलीच चर्चा रंगली होती. पण, आज शिवतारे यांनी धक्का देत अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे.
शिवसेनेचे माजी आमदार असलेले विजय शिवतारे यांच्या या निर्णयामुळे बारामती लोकसभेची निवडणूक रंगतदार होणार आहे. या निवडणुकीत अजित पवार गटाने सुनित्रा पवार, शऱद पवार गटाकडून सुप्रिया सुळे यांच्या नावाची अगोदरच घोषणा झाली आहे. त्यात हे तिसरे नाव आता पुढे आले आहे. महाराष्ट्रातील एकमेव मतदार संघ असा आहे. येथे तिन्ही उमेदवारांची नावांची घोषणा झाली असून त्यांनी प्रचारालाही सुरुवात केली आहे.