पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजत असतांना मनसेचे प्रदेश सरचिटणीस वसंत मोरे यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यानंतर ते कोणत्या पक्षात जातील याबाबत चर्चा रंगली आहे. दरम्यान वसंत मोरे यांच्याशो दोन पक्षांनी संपर्क केला आहे. त्याची माहिती वसंत मोरे यांनी दिली. ते म्हणाले की, काँग्रेसकडून मला विचारणा करण्यात आली आहे. माजी आमदार मोहन जोशी यांचा फोन आला होता. तसेच उध्दव ठाकरे गटाने सुध्दा ऑफर दिली आहे. मी पुणे लोकसभा निवडणुक लढवण्यावर ठाम आहे. कुणाकडू लढणार ते लवकरच जाहीर करणार आहे.
या अगोदर वसंत मोरे हे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात जाणार असल्याचे बोलले जात होते. काही दिवसांपूर्वी त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. पण, ती विकास कामांसाठी होती असे सांगून त्यांनी त्या चर्चेला विराम दिला होता. पण, आता त्यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिल्यामुळे चर्चेला उधान आले. त्यानंतर ते लोकसभा निवडणूक लढवण्यावर ठाम असल्यामुळे त्यांना काँग्रेस हाच पक्ष सोयीचा असणार असल्याचे बोलले जात आहे. काँग्रेसला महाविकास आघाडीकडून पुणे येथील जागा सोडली जाणार आहे. त्यामुळे वसंत मोरे हे काँग्रेसमध्ये जाण्याची शक्यता अधिक आहे. काँग्रेसने त्यांना उमेदवारी दिली तर पुणे येथील निवडणूक चुरशीची होणार आहे.
फायर ब्रँड नेता म्हणून ओळख असलेल्या वसंत मोरे यांचा प्रभाव असलेला भाग हा पुणे व बारामती लोकसभा मतदार संघात येतो. त्यामुळे त्याचा फायदा शरद पवार गटालाही मिळू शकतो. वंसत मोरे हे २००७ पासून पुणे महापालिकेत नगरसेवक आहेत. प्रत्येक वेळी ते नवनवीन प्रभागांमधून निवडून आलेले आहेत. कात्रजच्या दोन्ही बाजूकडील भागात त्यांचा प्रभाव आहे.