मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी महायुतीत सहभागी झालेल्या शिंदे गट व अजित पवार गटावर बोचरी टीका केली आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट टाकत त्यांना ‘स्वाभिमान गहाण टाकला की गुलामी पत्करावीच लागते’ याचा प्रत्यय आलाच असेल असे म्हटले आहे.
रोहित पवार यांनी सोशल मीडियावर टाकलेल्या पोसटमध्ये म्हटले आहे की, हरियाणामध्ये दोन जागांचा आग्रह करणाऱ्या ‘मित्राला’ भाजपने शिकवलेला धडा हा महाराष्ट्रातल्या मित्रांसाठी संदेश तर आहेच शिवाय अल्टिमेटम देखील आहे. हरियाणातील राजकीय घडामोड बघता विकासाच्या आणि विचारधारेच्या नावाखाली भाजपसोबत जाणाऱ्या महाराष्ट्रातील मित्रपक्षांच्या नेत्यांना ‘स्वाभिमान गहाण टाकला की गुलामी पत्करावीच लागते’ याचा प्रत्यय आलाच असेल.
उद्या लोकसभेसाठी राज्यात सर्वच मित्रपक्षांना कमळाच्या चिन्हावर लढावे लागले तर आश्चर्य वाटू नये. असो स्वतःच्या अडचणींमुळे नेते हतबल असले तरी तिकडे गेलेले आमदार मात्र हतबल नाहीत, ते नक्कीच योग्य तो बोध घेऊन सुयोग्य तो निर्णय लवकरच घेतील.