वंदना वेदपाठक, इंडिया दर्पण वृत्तसेवा
गेली दहा वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणारी मालिका चला हवा येऊ द्या ही आता बंद होणार आहे. या मालिकेच्या शेवटच्या भागाचे मंगळवारी शूटिंग झाले. या मालिकेचा सुत्रधार असलेल्या डॅा. निलेश साबळे याने अगोदरच मालिका सोडली. त्यानंतर कुशल बंद्रिकेने सुध्दा रामराम केला. पण, झीच्या टीमने सांगितल्यानंतर पुन्हा त्यांनी कार्यक्रम सुरु केला. पण, आता ही मालिकाच बंद होणार असल्याचे वृत्त समोर आल्यामुळे रसिक प्रेक्षकांचा हिरमोड होणार आहे.
संपूर्ण मराठी प्रेक्षकांच्या चेह-यावर हसू उमटवणारी ही मालिका टीआरपीमध्ये सुध्दा आघाडीवर असतांना तो आता बंद होणार आहे. विशेष म्हणजे ही मालिका बंद होणार असल्यामुळे या मालिकेतील तंत्रज्ञान, कर्मचारी अशा २०० हून अधिक जणांचा त्याचा फटका बसणार आहे.
या मालिकेचे शेवटच्या दिवसाचे हे शुटींग आहे याची कल्पना कोणाला नव्हती. पण, ‘चला हवा येऊ द्या’मधील भाऊ कदम, कुशल बद्रिके, भारत गणेशपुरे आणि श्रेया बुगडे या चौघांनाच शेवटच्या दिवसाच्या शूटची कल्पना देण्यात आली. त्यामुळे याचा मोठा धक्का टीमला बसला आहे.
ही विनोदी मालिक बंद होणार असल्याची आतापर्यंत फक्त चर्चा सुरू होती. पण, झी मराठी वाहिनीने अचानक हा कार्यक्रम बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.