नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महायुतीचे जागा वाटपाचा फॅार्म्यूला अद्याप ठरलेले नसतांना नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांनी नाशिक लोकसभा मतदार संघातील उमेदवाराची घोषणा केली. नाशिकमध्ये मंगळवारी आयोजित केलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात त्यांनी थेट विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनाच तिस-यांदा लोकसभेत पाठवायचे आहे असे सांगितले.
या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात श्रीकांत शिंदे म्हणाले प्रभू रामाचा धनुष्यबाण नाशिकमध्येच राहणार, हेमंत गोडसे यांना तिसऱ्यांदा लोकसभेत बहुमताने पाठवायचं आहे असे सांगत उमेदवारी जाहीर केली.
या कार्यकर्ता मेळाव्यात खा. हेमंत गोडसे यांनी मुख्यमंत्र्यांना सांगा की, प्रभू श्रीरामांचा धनुष्यबाण हा नाशिकमध्येच राहीला पाहिजे. त्यानंतर श्रीकांत शिंदे यांनी ही उमेदवारी थेट जाहीरच करुन टाकली. त्यांच्या या घोषणेमुळे भाजपच्या इच्छुकांमध्ये धाकधुक वाढली आहे. गेल्या काही दिवसांपासून नाशिक लोकसभा मतदार संघ भाजपसाठी सोडणार असल्याची चर्चा सुरु झाल्यामुळे खा. शिंदे यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे गोडसे यांना मात्र दिलासा मिळाला आहे.