ठाणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढवण्याची घोषणा केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार गटाने त्याला प्रत्त्युतर दिले आहे. मुख्यमंत्र्यांनी आपल्या नेत्यांना आवरले नाही, तर कल्याण लोकसभा मतदारसंघात वेगळा निकाल असे सांगत अजित पवार गटाचे नेते आनंद परांजपे शिंदे गटाला यांनी इशारा दिला आहे. मुख्यमंत्री शिंदे यांचे चिरंजीव डॉ. श्रीकांत कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार असल्यामुळे त्यांच्या या इशा-याची चांगलीच चर्चा रंगली आहे.
शिंदे गटाने अजित पवारांना बारामतीत डॅमेज केले, तर कल्याणमध्ये डॅमेज करण्याचा थेट इशारा अजित पवार गटाने दिला आहे. शिवतारे यांनी बारातमतीतून लढण्याची घोषणा केल्यानंतर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे प्रवक्ते आनंद परांजपे म्हणाले, की राष्ट्रवादीचे शक्तीस्थळ असलेल्या बारामती आणि रायगड लोकसभा मतदारसंघावर शिंदे गटाकडून सातत्याने टीका केली जात आहे. मुख्यमंत्र्यांनी आपल्या नेत्यांना आवारावे. आम्ही स्वाभिमानी कार्यकर्ते आहोत.