नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – संरक्षण, संशोधन आणि विकास संस्थेने स्वदेशी निर्मिती असलेल्या अग्नी-5 या क्षेपणास्त्राचे मल्टीपल इंडीपेन्डन्टली टारगेटेबल रीएन्ट्री वेईकल तंत्रज्ञान वापरुन पहिले यशस्वी उड्डाण केले. मिशन दिव्यास्त्र असे नाव असलेल्या या मोहिमे अंतर्गत ओदिशातील डॉ.एपीजे अब्दुल कलाम बेटावरुन हे उड्डाम करण्यात आले. विविध टेलीमेट्री आणि रडार केंद्रांनी रिएन्ट्री वेईकल्सचा माग काढला आणि निरीक्षण केले. मोहिमेसाठी आखलेले निकष या मोहिमेने पार केले.
ही जटील मोहिम प्रत्यक्षात आणल्याबदद्ल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संरक्षण, संशोधन आणि विकास संस्थेच्या शास्त्रज्ञांचे कौतुक केले. एक्स या समाजमाध्यमावरील संदेशात त्यांनी म्हटले आहे, “संपूर्णपणे स्वदेशात विकसित झालेल्या अग्नी 5 या क्षेपणास्त्राचे मल्टिपल इंडिपेंडंटली टारगेटेबल रिएंट्री वेईकल तंत्रज्ञान वापरून केलेले पहिले यशस्वी उड्डाण असलेल्या मिशन दिव्यास्त्राबद्दल आपल्या डीआरडीओमधील शास्त्रज्ञांचा अभिमान वाटतो.”
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही हे असाधारण यश असल्यांचे म्हणत शास्त्रज्ञांचे आणि त्यांच्या संपूर्ण चमूचे यशाबद्दल अभिनंदन केले.