इंडिया दर्णण ऑनलाईन डेस्क
पंढरपूर: विठ्ठलाच्या मंदिर गाभाऱ्याच्या कामासाठी चरणस्पर्श दर्शन १५ तारखेपासून दीड महिन्यांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला आहे. पण, याकाळात रोज सकाळी पाच ते रात्री अकरा वाजेपर्यंत मुखदर्शन मात्र घेता येणार आहे. विठ्ठल दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भक्तांना दर्शन मिळावे यासाठी प्रशासनाने काळजी घेतली आहे. हे मुखदर्शन लांबून घ्यावे लागणार आहे. या काळात काचपेटी काढून देवाचे नित्योपचार केले जाणार आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली मंदिर समिती , सल्लागार समिती आणि संतांच्या बैठकीत चरणस्पर्श दर्शन बंद करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. विठ्ठल मंदिराच्या ७३ कोटी रुपयांच्या विकास आराखड्याचे काम सुरू आहे. विठ्ठल व रुक्मिणी गाभाऱ्यात पुरातन रूप देण्याचे काम १५ तारखेपासून सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे चरणस्पर्श दर्शन बंद केले आहे.
देवाच्या गाभाऱ्यात लावलेली चांदी १५ ते १७ मार्च या दोन दिवसांत इन कॅमेरामध्ये काढली जाणार आहे. १७ तारखेपासून गाभाऱ्यातील ग्रॅनाईट, मार्बलच्या फरशा काढून मूळ दगडी भिंती उघड्या करण्यात येतील. गाभाऱ्यातील मूळ काळा पाषाणावर आलेले सिमेंटचे थर काढण्यासाठी वाळूच्या प्रेशरचा मारा केला जाईल. आषाढी एकादशी पूर्वी या आराखड्यातील बहुतांश कामे पूर्ण केली जाणार आहे.
सातशे वर्षापूर्वीचे विठ्ठल मंदिर कसे असेल, याची सगळ्यांना उत्कंठा लागली आहे. संपूर्ण मंदिरात आता पूर्वीच्याप्रमाणे दगडी फ्लोरिंग असणार आहे. यासाठी देगलूर येथील काळ्या पाषाणाच्या खाणीतून दगड आणला आहे. दगड घडविण्याचे हे काम रात्रंदिवस चालणार आहे.