इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
‘महासंग्राम’ म्हणून विश्वचषकाच्या ज्या सामन्याची चर्चा सुरु आहे त्या भारत विरुध्द पाकिस्तान सामन्याचा पहिला डाव नुकताच संपला असून पाकिस्तानने विजयासाठी भारताला ५० षटकात १९२ धावा करण्याचे आव्हान दिले आहे. पाकिस्तानचा डाव अवघ्या ४२.५ षटकात संपला.
अहमदाबाद मध्ये जवळपास सव्वा लाख प्रेक्षक क्षमतेच्या नरेंद्र मोदी मैदानावर आज भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने टॅास जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार रोहितचा मुड आज वेगळाच आहे. या ‘हाय व्होल्टेज’ सामन्यात पहिले पाकिस्तानला कमी धावात रोखणे आणि नंतर जे काही आव्हान मिळेल त्या धावसंख्येचा पाठलाग करणे हा रोहितचा मास्टर प्लॅन आहे. या प्लॅनप्रमाणे पहिला पार्ट आता संपला असून दुसरा पार्ट कसा यशस्वी करायचा, याची जबाबदारी भारतीय फंलदाजांवर आहे. आजच्या सामन्यात ईशान किशन ऐवजी डेंग्यूतून बरा होऊन आलेल्या आणि प्रचंड फार्मात असलेल्या शुभमन गिलला संघात संधी देण्यात आली आहे.
पहिल्या डावात भारतीय गोलंदाजापैकी मोहम्मद सिराजला आज त्याच्या पहिल्या षटकापासून चांगलाच मार पडला. परंतु, महत्वाच्या विकेटस् देखील त्यालाच मिळाल्या. सलामीचा फलंदाज अब्दुल्ला शफिक (२०) आणि कर्णधार बाबर आझम (५०) हे त्याला पहिल्या दोन स्पेलमध्ये मिळालेले २ बळी ठरले. दुसरीकडून कुलदीप यादवने तर कमालच केली. त्याने एकाच ओव्हर मध्ये सऊद शकील (६) आणि इफ्तिखार अहमद (४) हे स्वस्तातले बळी घेतले.
कुलदीप-जाडेजा या फिरकी जोडीने आज पाकिस्तानच्या धावांवर असा काही अंकुश ठेवला की, सुरुवातीला ३०० च्या पुढे धावसंख्या दर्शविणा-या ‘प्रेडीक्टर’चा आलेख त्यानंतर सपाट्याने खाली येत गेला. या संधीचेच औचित्य साधून कुलदीप यादवने २ आणि बुमराहने त्याच्या दुसऱ्या स्पेलमध्ये २ बळी घेवून पाकिस्तानी संघाचे कंबरडे पुरते मोडले. पत्याचा बंगला कोसळून पडावा तसा पाकिस्तानचा डाव षटकात सर्वबाद धावा, अशा केविलवाण्या परिस्थितीत संपुष्टात आला आहे.
या सामन्यात एक वेळ अशी आली होती की कर्णधार बाबर आझम आणि पाकिस्तानचा मुख्य फलंदाज मोहम्मद रिझवान या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ८२ धावांची मजबूत भागीदारी केली होती. त्यामुळे १५५ वर तिसरी विकेट पडल्यानंतर १९१ धावसंख्येत पाकिस्तानचा सगळा संघ गुंडाळण्यात भारतीय गोलंदाजांनी कसब दाखवले. या डावाचे वैशिष्ट्य म्हणजे जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, हार्दिक पांड्या, कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा या सर्व गोलंदाजांनी प्रत्येकी दोन बळी घेवून सांघिक खेळाचा उत्कृष्ट नमुना पेशकेला आहे. या महत्वाच्या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी त्यांचे काम पूर्ण केले असून आता भारतीय फलंदाजांना आपली जबाबदारी पार पाडण्यासाठी मैदानात उतरावे लागणार आहे.