इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
लोकसभा निवडणुकीपूर्वी हरियाणामध्ये भाजपाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे राजकीय खळबळ निर्माण झाली. पण, अवघ्या काही तासातच भाजपने मुख्यमंत्रीपदासाठी नायब सैनी यांची निवड केली आहे. आज सायंकाळी ते पदाची शपथ घेणार आहे. खट्टर यांनी राजीनामा दिल्यानंतर विधिमंडळाची बैठक झाली. त्यात विधिमंडळ गटनेते म्हणून नायब सैनी यांचे नाव निश्चित झाले.
भाजपा आणि जननायक जनता पार्टी (JJP) यांची आघाडी तुटल्यामुळे खट्टर यांनी राजीनामा दिला. आगामी लोकसभा निवडणुकीत जागा वाटपाच्या मुद्यावरुन ही आघाडी तुटल्याच बोलले जात आहे. जेजेपीचे दुष्यंत चौटाला हे खट्टर सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होते. त्यांना लोकसभेच्या १ ते ३ जागांची मागणी केली. पण, भाजप त्यासाठी एकही जागा सोडण्यास तयार नव्हता. त्यामुळे त्यांनी सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.
सुरुवातीला मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर हेच पुन्हा मुख्यमंत्री होणार असल्याचे बोलले जात होते. संजय भाटीया यांचेही नाव मुख्यमंत्री पदासाठी चर्चेत होते. पण, भाजपने पुन्हा धक्कातंत्र वापरत नायब सैनी यांना मुख्यमंत्री केले. सैन हे हरियाणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष असून त्यांना ही संधी देण्यात आली आहे.
आघाडी तुटल्यानंतर भाजपा हरियाणामध्ये अपक्ष आमदारांच्या समर्थनाने आरामात सरकार बनवू शकते. भाजपाला जेजेपीची आवश्यकता नाहीय. त्यांच्याशिवाय ते सरकार स्थापन करु शकतात अशी येथील राजकीय परिस्थिती आहे.