नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भाजपची दिल्लीत आज केंद्रीय निवडणूक समितीची बैठकीत २५ जागांवर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार आशिष शेलार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे दिल्लीला गेले होते.
या बैठकीआधी भाजपच्या राज्याच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. त्यानंतर पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक पार पडली. या बैठकीला भाजपचे केंद्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. या बैठकीत महाराष्ट्रातील २५ जागांवर चर्चा झाली आहे. त्यानंतर आता उद्या भाजपची उमेदवारांची दुसरी यादी येण्याची शक्यता आहे. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाच्या जागांवर चर्चाही झाली.
यांची उमेदवारी फिक्स
भाजपच्या या बैठकीत नागपुरातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, बीडमधून पंकजा मुंडे, चंद्रपुरातून सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. तर जालन्यातून मंत्री रावसाहेब दानवे यांना पुन्हा एकदा संधी दिली जाण्याची शक्यता आहे. तर पुण्यातून माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. सांगलीतून संजयकाका पाटील यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांना भिवंडीतून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. तर केंद्रीय मंत्री भारती पवार यांना दिंडोरीतून उमेदवारी देण्याबाबत चर्चा झाल्याचे बोलले जात आहे.