इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नागपूर : स्व. दत्ताजी डिडोळकर हजारो कार्यकर्त्यांचे आधार होते. त्यांनी अनेकांना जीवनात संघर्षातून मार्ग काढून दिला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेवर असतानाही त्यांचा विद्यार्थ्यांना आधार होता. याशिवाय इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्येही त्यांनी शिक्षण घेतले. त्यामुळे झिरो माईल ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ या मार्गाला स्व. दत्ताजी डिडोळकर यांचे नाव देताना मनापासून आनंद होत आहे, अशी भावना केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी आज (शनिवार) व्यक्त केली.
झिरो माईल ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ या मार्गाचे ‘स्व. दत्ताजी डिडोळकर मार्ग’ असे नामकरण शनिवारी करण्यात आले. तसेच मानस चौक ते इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या भुयारी मार्गाचे भूमिपूजन करण्यात आले. ना. श्री. नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला. यावेळी स्व. दत्ताजी डिडोळकर यांच्या म्युरलचे अनावरणही ना. श्री. गडकरी यांच्या हस्ते झाले.
नागपूर महानगरपालिका, महामेट्रो व स्व. दत्ताजी डिडोळकर जन्मशताब्दी समारोह समिती यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठ मार्गावर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. म्युरल साकारणारे संजय गर्जलवार यांचा ना. श्री. गडकरी यांनी सत्कार केला. तसेच स्व. दत्ताजींच्या कुटुंबियांचाही विशेष सत्कार यावेळी करण्यात आला. ना. श्री. गडकरी उपस्थितांशी संवाद साधताना म्हणाले, ‘दत्ताजी डिडोळकर यांनी केरळ आणि तामिळनाडूमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मोठे कार्य केले. नागपूरला आल्यावर त्यांचे सामाजिक कार्य सुरू राहिले. ते विद्यार्थ्यांमध्ये कमालीचे लोकप्रिय होते. अनेक विद्यार्थ्यांचे आयुष्य त्यांनी घडवले आणि आज त्यातील अनेकजण मोठमोठ्या पदांवर आहेत. एक अजातशत्रू, निःस्पृह, निःस्वार्थी आणि राष्ट्रासाठी समर्पित असे व्यक्तिमत्व म्हणून दत्ताजींचा नावलौकीक होता. या मार्गाच्या निमित्ताने पुढच्या पिढ्यांपर्यंत दत्ताजींचे नाव आणि कार्य पोहोचणार आहे, याचा मला विशेष आनंद आहे.’
पश्चिम नागपूरला जोडणारा मार्ग
मानस चौक ते इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स हा भुयारी मार्ग पूर्व, मध्य आणि दक्षिण नागपूरला पश्चिम नागपूरशी जोडण्याचे काम करणार आहे. ऐंशी कोटी रुपयांच्या या भुयारी मार्गाचे काम लवकरच सुरू होणार आहे, अशी माहिती ना. श्री. गडकरी यांनी यावेळी दिली. आजवर अनेक रस्ते, उड्डाणपूल आणि टनेल्स केले, पण आज या मार्गाला आणि भुयारी मार्गाला दत्ताजींचे नाव देऊ शकलो, ही माझ्यासाठी अत्यंत आनंदाची बाब ठरते, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.
दोनशे कोटींच्या विकासकामांना मंजुरीची घोषणा
ना. श्री. नितीन गडकरी यांनी यावेळी नागपूरसह विदर्भातील दोनशे कोटींच्या विकासकामांना मंजुरी देण्यात आल्याची घोषणा केली. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने २०२२-२०२३ या वर्षात एकूण २५ आरओबी आणि आरयूबी च्या बांधकामांना मुख्यतः मान्यता दिली आहे. यामध्ये महामेट्रो नागपूरतर्फे करण्यात येणाऱ्या पाच कामांचाही समावेश आहे. यामध्ये अमरावती ते नरखेड या रेल्वे मार्गावर आरओबीचे बांधकाम, कोलकाता रेल्वे मार्गावरील नाईक तलाव बांगलादेश ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर गार्डन वैशाली नगर येथे आरयूबीचे बांधकाम, वर्धा रोडवरील मनीष नगर आरयूबीचे मनीष नगरपर्यंत पोचमार्गाचे बांधकाम, मनीष नगर रेल्वे क्रॉसिंग नागपूर येथे कमी उंचीच्या भुयारी मार्गाचे बांधकाम आदींचा समावेश आहे, असे ना. श्री. गडकरी यांनी सांगितले.