नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- रविशंकर मार्ग येथे पत्नीसोबत असलेल्या अनैतिक संबंधावरून तिच्या प्रियकराला जाब विचारण्यास गेलेल्या पतीची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रियकर व त्याच्या भावाने अगोदर मारहाण करुन नंतर डोक्यात हेल्मेट मारल्याने जाब विचारणा-या पतीचा मृत्यू झाला आहे. तर पतीने केलेल्या चाकू हल्ल्यात प्रियकर गंभीर जखमी झाला आहे.
या घटनेत प्रियकराच्या भावाला पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने त्याला १४ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. पतीचा मृत्यू गोळीबारात झालेला नाही, अशी माहिती पोलिस उपायुक्त मोनिक राऊत आणि सहाय्यक आयुक्त सचिन बारी यांनी उपनगर पोलिस ठाण्यात सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कुंदन अरविंद घडे (वय ४८) हा नाशिक-पुणे मार्गावरील रविशंकर मार्गावरील कल्पतरू नगरमधील महादेव पार्क सोसायटीत राहतो. त्याचा आयात-निर्यातीचा व्यवसाय आहे. नागपूरला राहणारा त्याचा भाऊ चेतन घडे दहा दिवसापूर्वी नामकरण विधीसाठी कुंदनकडे आला होता. कुंदन घडेसोबत आपल्या पत्नीचे काही दिवसांपासून अनैतिक संबध असल्याचा संशय अमोल काटे (वय ४०, रा. एकलहरे) याला होता. लष्करातून निवृत्त झालेला अमोल जाब विचारण्यासाठी रात्री पिस्तोल आणि चाकू घेऊन १० मार्च रोजी रात्री नऊच्या सुमारास महादेव सोसायटीत कुंदन घडेकडे गेला. तेथे दोघांमध्ये वाद झाले. अमोल काटेने कुंदनच्या दिशेने एक गोळी झाडली. त्यातून कुंदन वाचला. नंतर अमोलने कुंदनवर चाकू हल्ला केला. कुंदनचा भाऊ चेतन हा भावाच्या मदतीला धाऊन आला. दोघांनी अमोल काटेला पकडून मारहाण केली. तसेच हेल्मेट डोक्यात मारले. त्यामुळे अमोल काटेचा मृत्यू झाला. मृत अमोलने आपल्या हातावर आपले नाव गोंदवले होते. त्यावरून त्याची ओळख पटली. त्याचा मेव्हणा संदीप वराडे याने सांगितले की, कुंदन घडेचे अमोल काटेच्या पत्नीशी अनितक संबंध होते. त्यामुळे प्रचंड मनस्तापात असलेला अमोल हा कुंदनला समजविण्यासाठी त्याच्या घरी गेला होता. तेथे कुंदन व चेतन घडे या भावांनी हेल्मेट व लाथाबुक्क्याने त्याला ठार मारले.
संदीप वराडे याच्या तक्रारीवरून कुंदनविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. मृत्यू झालेल्या अमोल काटे याच्यामागे पत्नी, एक मुलगा, मुलगी असा परिवार आहे. हल्ल्यात कुंदन घडे गंभीर जखमी झाल्याने त्यास खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती गंभीर आहे. त्याचा जबाब पोलिसांना घ्यायचा आहे. पोलिसांनी चेतनला नाशिक रोड न्यायालयापुढे सादर केले असताना १४ मार्च पर्यंत पोलिस कोठडी दिली. मृत अमोल काटेने पिस्तुल कोठून आणली, याचा तपास सुरु आहे. त्याच्याविरुध्दही गुन्हा दाखल झाला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रवीण चौधरी, मिलिंद बागूल तपास करत आहेत.