मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यातील यंत्रमागधारकांच्या समस्यांचा अभ्यास करून त्यावर उपाययोजना सुर्चावण्यासाठी ना. दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली लोकप्रतिनिधींची समिती शासनाने गठित केली होती. या समितीने यंत्रमागधारकांच्या समस्या, चर्चा व बैठकीद्वारे जाणून घेतल्या. तसेच प्रत्यक्ष भेटी देऊन अभ्यासपूर्ण अहवाल शासनास सादर केला.
अहवालातील काही मुद्यांपैकी एक २७ एचपी खालील साध्या यंत्रमागांना प्रति युनिट १ रु. प्रमाणे ‘विशेष अनुदान’ वीज दर सवलत म्हणून देण्यात यावे. २७ एचपी ते २०१ एचपी या प्रवर्गातील यंत्रमागांना नवसंजीवनी देण्यासाठी अतिरिक्त रु. ०.७५ प्रति युनिट इतकी वीजदर सवलत देण्यात यावी, अशी शिफारस करण्यात आली होती.
त्या अनुषंगाने आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये समितीने शिफारस केल्याप्रमाणे १ रु. व ०.७५ पैसे वीज दर सवलत देण्यात मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.यंत्रमागधारकांना अतिरिक्त वीज सवलत योजना लागू केल्याचा निर्णय घेतल्यामुळे समितीचे अध्यक्ष ना. दादाजी भुसे यांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री, ना. देवेंद्रजी फडवणीस व ना. अजितदादा पवार तसेच सर्व मंत्रीमंडळाचे अभिनंदन करून आभार मानले.
यंत्रमाग व्यवसाय हे रोजगार देणारे क्षेत्र असून या वीजदर सवलतीमुळे यंत्रमागधारकांना दिलासा मिळणार आहे, असे ना. दादाजी भुसे यांनी सांगितले.