नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी आज महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग येथे एमएसएमई -तंत्रज्ञान केंद्राची पायाभरणी केली. यावेळी सिंधुदुर्ग औद्योगिक महोत्सव आणि स्वयंरोजगार संमेलनाचे उद्घाटन देखील नारायण राणे यांच्या हस्ते करण्यात आले.अतिरिक्त सचिव आणि विकास आयुक्त, (एमएसएमई) डॉ रजनीश तसेच मंत्रालयाचे इतर वरिष्ठ अधिकारी आणि मान्यवर अतिथीही यावेळी उपस्थित होते.
सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांद्वारे तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यासाठी भारत सरकार देशभरात 20 नवीन तंत्रज्ञान केंद्रे आणि 100 विस्तार केंद्रे स्थापन करणार आहे. 182 कोटी रुपयांच्या अंदाजे प्रकल्प खर्चासह सिंधुदुर्ग येथे बांधण्यात येणारे एमएसएमई -तंत्रज्ञान केंद्र सामान्य अभियांत्रिकी आणि अन्न प्रक्रिया यांसारख्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करेल आणि जवळपासच्या भागातील एमएसएमईसाठी विकासाच्या नवीन संधी निर्माण करेल.
2030 पर्यंत भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल, असे राणे यावेळी बोलताना म्हणाले. सिंधुदुर्ग येथील तंत्रज्ञान केंद्र युवकांना विविध क्षेत्रातील अत्याधुनिक प्रशिक्षण देईल. यामुळे राज्याच्या वृद्धीला आणि औद्योगिक विकासाला आणखी चालना मिळेल आणि अन्न प्रक्रिया हा या क्षेत्रातील एक प्रमुख औद्योगिक उपक्रम होईल, यावर त्यांनी भर दिला.
2047 पर्यंत भारत एक विकसित देश होईल हे सुनिश्चित करण्यासाठी एमएसएमई जागतिक स्तरावर स्पर्धात्मक आणि जागतिक दर्जाचे बनले पाहिजेत, असे अतिरिक्त सचिव आणि विकास आयुक्त, (एमएसएमई) डॉ रजनीश यांनी सांगितले. देशभरातली तंत्रज्ञान केंद्रे या परिवर्तनात मोठी भूमिका बजावतील, असे ते म्हणाले. नारायण राणे यांनी यावेळी पीएम विश्वकर्मा योजनेवर आधारित प्रदर्शनाचे उद्घाटन केले आणि जनतेशी संवाद साधला.