नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हरयाणातील गुरुग्राम येथे देशभरातील सुमारे एक लाख कोटी रुपये खर्चाच्या 112 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी केली. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून देशभरातून लाखो लोक या कार्यक्रमाशी जोडले गेले. हे प्रकल्प राष्ट्रीय महामार्गाच्या जाळ्याच्या विकासात महत्वाचे योगदान देतील, तसेच सामाजिक आणि आर्थिक प्रगती उंचावत, रोजगाराच्या संधी आणि देशभरात वेगवेगळ्या भागांमधील व्यापार उदीम आणि व्यवसाय यांना चालना देतील.
दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन झालेल्या रस्ते प्रकल्पांमध्ये महाराष्ट्र राज्यातील रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या (एमओआरटीएच) पाच प्रकल्पांचा समावेश आहे, ज्यांचा एकूण प्रकल्प खर्च 3297 कोटी रुपये आहे.
महाराष्ट्रातील हे एमओआरटीएच प्रकल्प खालीलप्रमाणे आहेत:
वडीगोद्री – 194 कोटी रुपये खर्चाचा धनग्रीपिंप्री महामार्ग
1598 कोटी रुपये खर्चाचा वडपाळे – भोगाव खुर्द प्रकल्प.
अहमदनगर बायपास – खरवंडी प्रकल्प खर्च 226 कोटी रुपये
राहुरी – सोनई – शनी शिंगणापूर हा 136 कोटी रुपये खर्चाचा प्रकल्प.
एनएचडीपी टप्पा -IV (Pkg-IV) अंतर्गत एचएएम मोडवर NH-66 च्या कशेडी घाट-परशुराम घाट विभाग [Km 161/600-Km 205/400] च्या 4-पदरी पुनर्वसन आणि आधुनिकीकरण प्रकल्पाचा खर्च 1143 कोटी रुपये आहे.
केवळ दिल्लीत कार्यक्रम आयोजित संस्कृतीपासून आता देशाच्या इतर भागांमध्ये हे मोठे कार्यक्रम आयोजित करण्याच्या संस्कृतीचा उल्लेख यावेळी बोलताना पंतप्रधानांनी केला. आज देशाने आधुनिक संपर्क सुविधांच्या दिशेने आणखी एक मोठे आणि महत्त्वाचे पाऊल टाकले आहे, असे ते म्हणाले.
2024 या वर्षाच्या तीन महिन्यांपेक्षा कमी कालावधीत, 10 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या प्रकल्पाचे एकतर राष्ट्रार्पण करण्यात आले आहे किंवा त्यांची पायाभरणी करण्यात आली आहे, असे पंतप्रधानांनी प्रकल्पांच्या अंमलबजावणीच्या गतीमध्ये झालेल्या बदलावर भर देताना सांगितले. आजच्या एक लाख कोटींहून अधिक खर्चाच्या 100 हून अधिक प्रकल्पांमध्ये दक्षिणेकडील कर्नाटक, केरळ आणि आंध्र प्रदेशातील विकास प्रकल्पांचा समावेश आहे, उत्तरेकडील उत्तर प्रदेश आणि हरयाणाशी संबंधित विकास कामे आहेत, पूर्वेकडे बंगाल आणि बिहारचे प्रकल्प आहेत तर, पश्चिमेकडे, महाराष्ट्र, पंजाब आणि राजस्थानमधील मोठे प्रकल्प आहेत. समस्यांकडून शक्यतांच्या दिशेने झालेल्या स्थित्यंतराचा ठळकपणे उल्लेख करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पायाभूत सुविधा विकासाच्या परिवर्तनकारी प्रभावावर अधिक भर दिला. आव्हानांना संधींमध्ये रुपांतरित करण्याचा त्यांच्या प्रशासनाचा गुरुमंत्र त्यांनी अधोरेखित केला.
पायाभूत सुविधा विकास आणि गरिबी निर्मूलन यांच्यातील परस्पर संबंधांवर अधिक भर देत पंतप्रधानांनी ग्रामीण भागातील सुधारलेले रस्ते आणि डिजिटल संपर्क सुविधा यांनी गावातील लोकांसाठी नव्या संधी कशा प्रकारे निर्माण केल्या आहेत हे ठळकपणे मांडले. डिजिटल पायाभूत सुविधांमुळे तसेच आरोग्य सेवा आणि शिक्षण यांसारख्या अत्यावश्यक सेवांची उपलब्धता होऊ लागल्यामुळे भारताच्या ग्रामीण भागात उदयाला येऊ लागलेल्या नव्या संधींचा त्यांनी उल्लेख केला. “अशा प्रकारच्या उपक्रमांनी गेल्या 10 वर्षांत 25 कोटी भारतीयांना दारिद्र्य रेषेच्या बाहेर पडण्यासाठी मदत झाली आणि आता भारत जागतिक पातळीवर पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था झाला आहे,” पंतप्रधान म्हणाले. त्यांनी पुढे सांगितले, “देशात सुरु असलेले हे वेगवान पायाभूत सुविधा विकास कार्य भारताला जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्यास मदत करेल.” पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण भारतातील पायाभूत सुविधांच्या विकासाला गती देण्याच्या सरकारच्या बांधिलकीचा पुनरुच्चार केला. अशा उपक्रमांमुळे केवळ देशाची अर्थव्यवस्था मजबूत होत नाही तर विशेषत: तरुणांसाठी रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होतात यावर त्यांनी भर दिला.
पंतप्रधान म्हणाले, “पूर्वी विलंब होत होता, आता वितरण होत आहे. पूर्वी विलंब होत होता, आता विकास होत आहे. ते म्हणाले की 9 हजार किमीचा जलदगती कॉरिडॉर तयार करण्यावर लक्ष केंद्रित केले जात असून त्यापैकी 4 हजार किमी आधीच बांधण्यात आले आहे. वर्ष 2014 मध्ये 5 शहरांपूर्ती मर्यादित असलेली मेट्रो आता 21 शहरांपर्यंत पोहोचली आहे. “हे काम विकासाच्या दृष्टीकोनातून केले जात आहे. हेतू योग्य असताना या गोष्टी घडतात. आगामी 5 वर्षांत विकासाचा हा वेग अनेक पटींनी वाढेल,” असा विश्वास व्यक्त करत पंतप्रधानांनी भाषणाचा समारोप केला.