मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी नाशिकच्या त्र्यंबक रोड परिसरात पशुसंवर्धन विभागाच्या ताब्यातील आवश्यक जागा यापूर्वी उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्या जागेवर वसतिगृह उभारण्यातील जमीन प्रश्नाबाबत येणारे अडथळे दूर करावेत, अशा सूचना महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या.
नाशिकच्या मंजूर जागेवर वसतिगृह उभारण्यात येणारे अडथळे दूर करण्यासाठी मंत्री श्री. विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज येथे झालेल्या बैठकीस आमदार गोपीचंद पडळकर, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास विभागाचे प्रधान सचिव तुकाराम मुंढे, इतर मागासवर्ग बहुजन कल्याण विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंगल, दुग्ध विकास आयुक्त पी.पी.मोहोड आदी उपस्थित होते.
मंत्री श्री.विखे पाटील म्हणाले की, वसतिगृहासाठी शासनाने यापूर्वीच जमीन उपलब्ध करून दिली आहे. दुग्धव्यवसाय विकास विभाग व संबंधित विभाग समन्वयाने कार्यवाही करावी. उपलब्ध जागेच्या प्रश्नासंदर्भात अडथळे दूर होण्याच्या दृष्टीने संबंधित विभागांनी आवश्यक कार्यवाही करावी. यासाठी समाजाची मागणी विचारात घेतली असून याप्रश्नी सकारात्मक भूमिका असल्याचे मंत्री श्री. विखे पाटील यांनी सांगितले.
आमदार श्री.पडळकर व संबंधित प्रतिनिधींनी या कामातील अडथळे व सुरू असलेल्या प्रक्रियेबाबत म्हणणे सादर केले. धनगर समाजाच्या मुले व मुलीसाठी वसतिगृहाच्या इमारत उभारण्यासाठी पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास विभागाच्या अखत्यारीतील जागा, नियोजन व कार्यवाहीबाबत प्रधान सचिव श्री मुंडे, प्रधान सचिव श्रीमती सिंगल, आयुक्त श्री. मोहोड आणि नाशिक जिल्हाधिकारी यांनी माहिती दिली. यावेळी दुग्ध व्यवसाय विकास विभागाच्या अश्विनी यमगर, उपायुक्त श्री.शिरपूरकर, राजेश निकनवरे आदींसह विविध विभागांचे अधिकारी तसेच किरण थोरात, नीलेश हाके हे प्रतिनिधी उपस्थित होते.