इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नवी दिल्ली- केंद्र सरकारने सीएए अर्थात सिटीजनशिप अमेंडमेंट ऍक्ट अखेर देशभरात लागू केला आहे. सीएए बिल संसदेने मंजूर करून जवळपास पाच वर्षे उलटली आहेत. आता केंद्र सरकारने आगामी लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्यापूर्वी देशात सीएए लागू केला आहे. याबाबतची अधिसूचना केंद्र सरकार जारी करण्यात आली आहे.
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये पश्चिम बंगालच्या भेटी दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नागरिकत्व सुधारणा कायद्या लोकसभा निवडणुकीपूर्वी लागू करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर तो आज लागू झाला. सीएए अंमलबजावणी कोणीही रोखू शकत नाही.सीएए कोणत्याही व्यक्तीचे नागरिकत्व काढून घेणार नाही. त्याचा उद्देश केवळ धार्मिक छळाचा सामना करत असलेल्या पाकिस्तानी, अफगाण आणि बांगलादेशी अल्पसंख्याकांना नागरिकत्व देणे असल्याचेही त्यावेळी त्यांनी म्हटले होते.
मोदी सरकारने लागू केलेल्या सीएएचे उद्दिष्ट ३१ डिसेंबर २०१४ पूर्वी बांगला देश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानात आलेल्या हिंदू, शीख, जैन, बौद्ध, पारशी आणि ख्रिश्चनांसह छळ झालेल्या गैर-मुस्लिम स्थलांतरितांना भारतीय नागरिकत्व प्रदान करणे आहे.