नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- सिडकोतील शिवाजीचौक भागात घरगुती भांडणाच्या कारणातून पतीने पत्नीस जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. या घटनेत रॉकेल ओतून पेटवून देण्यात आल्याने पत्नी गंभीर भाजली असून, याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार गौतम शंकर पंडीत (३५ रा.इंदिरानगर वसाहत क्र.१ शिवाजीनगर) असे पत्नीस पेटवून देणा-या संशयित पतीचे नाव आहे. याबाबत रेखा पंडीत (३०) यांनी फिर्याद दिली आहे. रविवारी (दि.१०) सायंकाळच्या सुमारास पंडीत दांम्पत्या घरगुती कारणातून वाद झाला होता. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्याने संतप्त पतीने घरातील स्टोव्ह मधील रॉकेल पत्नीच्या अंगावर टाकून तिला पेटवून दिले होते.
या घटनेत रेखा पंडीत या गंभीर भाजल्या असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याबाबत फिर्याद दाखल होताच पोलीसांनी संशयितास अटक केली असून अधिक तपास जमादार हारूण शेख करीत आहेत.