इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
लखनऊः उत्तर प्रदेशातील गाझीपूरमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. प्रवासी बसला लागलेल्या आगीत पाच जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. आगीचे कारण उच्चदाबाची वीजवाहिनी सांगितले जात आहे. ११ हजार व्होल्टच्या वीजवाहिनीचा स्पर्श झाल्याने बसला आग लागली. आगीने काही वेळातच उग्र रूप धारण केले. बसमध्ये बसलेल्या प्रवाशांमध्ये आरडाओरडा झाला. आगीत लहान मुलेही बळी पडण्याची शक्यता आहे. यात अनेक प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. मृतांचा नेमका आकडा कळू शकलेला नाही.
या भीषण आगीत भाजलेल्यांना रुग्णालयात नेण्यात येत आहे. मर्दह पोलिस ठाण्याच्या हद्दीतील महाहर धामजवळ वीजवाहिनीचा स्पर्श झाल्याने प्रवाशांनी भरलेल्या बसला आग लागली. अपघातग्रस्त बस काही वेळातच पेटू लागली. ज्वाळा वरच्या दिशेने येऊ लागल्या. आगीची तीव्रता पाहून बसजवळ जाण्याचे धाडस होत नव्हते. प्रशासनाच्या पथकाने बचाव कार्याची जबाबदारी घेतली. प्रवाशांना बसमधून बाहेर काढण्यात आले. या आगीत अनेक प्रवासी जखमी झाले असून गंभीररीत्या भाजल्याचे सांगण्यात येत आहे.