इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर विरोधक पुरंदरचे माजी आमदार विजय शिवतारे यांनी बारामती लोकसभा निवडणूक लढणार असल्याची घोषणा केली आहे. ते म्हणाले, की चिन्ह कोणते असेल, हे अजून ठरलेले नाही; परंतु मी लोकसभा लढवण्यावर ठाम आहे. खा. सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्या विरोधात मी निवडणूक लढणार आहे. पाच लाख ८० हजार मतदार पवार कुटुंबीयांच्या विरोधात असून त्यांच्यासाठी मी पर्याय आहे. अजित पवार यांच्या प्रवृत्ती विरोधात आणि खा. सुळे यांच्या अकार्यक्षमतेविरोधात मी निवडणुकीच्या रिंगणात उभा असेन. यासंदर्भात मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहे.
सासवडमधील पालखीतळावर अजित पवार यांनी केलेला अपमान, केवळ माझा नसून तो संपूर्ण पुरंदरच्या स्वाभिमानी जनतेचा आहे, अशी तोफ डागून अजित पवार त्या अपमानासाठी इथे येऊन माफी मागणार का? असा प्रश्न शिवतारे यांनी केला आहे. बारामती लोकसभा मतदारसंघ हा कोणाचा सातबारा नसल्याचे सांगत त्यांनी पवार कुटुंबीयांवर टीका केली. लोकसभेच्या निवडणुकीत आरपारची लढाई करण्याचा निर्णय शिवतारे यांनी घेतला आहे. आता गुलामगिरी करणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.