नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- आनंदवलीतील बेंडकुळेनगर भागात ग्रीलचे काम करीत असतांना तीस-या मजल्यावरून पडल्याने ३९ वर्षीय कामगाराचा मृत्यू झाला. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार नामदेव विठ्ठल कासव (रा.दिपज्योती अपा.हनुमानवाडी) असे मृत कामगाराचे नाव आहे. कासव रविवारी (दि.१०) सायंकाळच्या सुमारास बेंडकुळे नगर भागातील आदिराज बॉसम या इमारतीच्या तीस-या मजल्यावर ग्रील फिटींगचे काम करीत असतांना ही घटना घडली.
खिडकीला ग्रील बसवित असतांना चक्कर आल्याने ते जमिनीवर कोसळले होते. या घटनेत त्यांना गंभीर दुखापत झाल्याने भाऊ अक्षय कासव यांनी तातडीने जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार झिरवाळ करीत आहेत.