नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- जेलरोड भागात भोंदूबाबाने २१ लाखाला गंडा घातल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुलीच्या लग्नासाठी जमवाजमव करून घरात ठेवलेल्या रोकडवर भोंदूबाबाने डल्ला मारला आहे. घरी आलेल्या बाबासह त्याच्या साथीदाराने भक्तास नारळ घेण्यासाठी दुकानात पाठवून, कपाटातील तब्बल २१ लाख रूपयांची रोकड लांबविली असून, या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार गोपाल महाराज व त्यांचा साथीदार अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत रामदास दोडके (रा.भैरवनाथनगर,जेलरोड) यांनी फिर्याद दिली आहे. दोडके काही महिन्यांपूर्वी आळंदी येथे गेले होते. यावेळी त्यांची भेट संशयित गोपाल महाराज या बाबाशी झाली होती. या भेटीत बाबाने दोडके यांना मुलीच्या विवाहासह भरभराट होईल असा आशिर्वाद देत प्रसाद दिला होता. त्यानंतर दोडके यांच्या मुलीचा विवाह ठरला.
या विवाहाची तारीख निश्चित करण्यात आल्याने पैशाची जमवाजमव करीत दोडके यांनी घरात २१ लाखाची रोकड ठेवली होती. शनिवारी (दि.९) नातेवाईकाचे निधन झाल्याने दोडके कुटुंबिय बाहेरगावी गेलेले असतांना ही घटना घडली. त्र्यंबकेश्वर येथे बाबा देवदर्शनासाठी येणार असल्याने रामदास दोडके घरीच थांबले होते. दोडके यांनी बाबा व त्यांच्या एका भक्तास देवदर्शन घडवून आणत नंतर आपल्या घरी आणले असता ही चोरी झाली. घरी परतलेल्या दोडके यांना बाबाने दुकानातून नारळ व दुधाची पिशवी आणण्यासाठी पाठवून आपले इप्सीत साध्य केले. दोडके घराबाहेर पडताच भामट्या बाबासह त्याच्या साथीदाराने कपाटात ठेवलेली २१ लाखाची रोकड लांबविली असून, अधिक तपास उपनिरीक्षक जितेंद्र माळी करीत आहेत.