इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नवी दिल्लीः लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्ष टप्याटप्याने उमेदवारांची यादी जाहीर करत आहे. अगोदर भाजप आणि काँग्रेसने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यानंतर तृणमूल काँग्रेसने सर्वच उमेदवार घोषीत केले. आता पुन्हा काँग्रेसची दुसरी यादी जाहीर होणार आहे. आज पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची दुसरी बैठक संध्याकाळी दिल्ली एआयसीसीच्या मुख्यालयात होणार आहे. मल्लिकार्जुन खर्गे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होईल.
काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी आणि काँग्रेस खासदार राहुल गांधीही उपस्थित राहण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही बैठक संध्याकाळी सहा वाजता बोलावण्यात आली आहे. त्यात राजस्थान, कर्नाटक, छत्तीसगड, हरियाणा, तामिळनाडू, दिल्ली, मध्य प्रदेश, उत्तराखंडच्या लोकसभा जागांवर चर्चा होणार आहे.
काँग्रेसच्या पहिल्या यादीत केवळ ३९ उमेदवारांची नावे होती. त्यात छत्तीसगड, कर्नाटक, केरळ, लक्षद्वीप, मेघालय, नागालँड, सिक्कीम, तेलंगणा आणि त्रिपुरा या लोकसभा जागांवर तिकीट देण्यात आले होते. घोषित एकूण ३९ उमेदवारांपैकी १६ केरळमधील, सात कर्नाटकातील, सहा छत्तीसगड आणि चार तेलंगणातील, दोन मेघालय आणि नागालँडमधील, प्रत्येकी एक सिक्कीम आणि लक्षद्वीपमधील आहेत.