मनमाड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहराला पाणी पुरवठा करणा-या वागदर्डी धरणाने तळ गाठला असून धरणात डेड स्टॉक मधून सध्या महिन्यातून एकदाच पाणी पुरवठा करण्यात येत आहे. यंदा पावसाने ओढ दिल्याने धरण भरलेच नाही. त्यामुळे मनमाडकर नागरीकांना पालखेड धरणातून सुटणा-या पाण्याच्या आवर्तनावर अवलंबून रहावे लागत आहे.
पालखेड धरणातून दुसरे आवर्तन कधी सुटणार हे मात्र अद्याप निश्चित नसल्याने मनमाडकरांवर पाणी टंचाईचा तीव्र सामना करण्याची वेळ आली आहे. भरीस भर म्हणज भूजल पातळीत घट झाल्याने कूपनलिकां मधील पाणी आटत चालल्याने पाण्यासाठी यंदाच्या उन्हाळ्यात जलसंघर्ष तर करावा लागणार तर नाही ना..असा प्रश्न आता पासूनच उपस्थित होऊ लागला आहे.