मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागण्यापूर्वी राज्य सरकारने दोन दिवसांत तब्बल २६९ शासन निर्णय काढण्यात आले आहेत. या जीआरमध्ये अनेक विकास कामांबद्दल निर्णय घेण्यात आले आहेत.
यापूर्वी मार्चअखेरच्या दोन दिवसांत शेकडो शासनादेश निघत असतात. या वेळी मात्र लोकसभेची आचारसंहिता लागण्याची शक्यता लक्षात घेऊन सरकार गतिमान झाले आहे. राज्य सरकारकडून घेण्यात आलेल्या निर्णयात पदस्थापना, जल प्रकल्प, कोकणातील कामे, निधींची पूर्तता अशा शासन निर्णयाचा समावेश आहे.
सात तारखेला १७३ शासन निर्णय, तर सहा तारखेला ९६ शासन निर्णय जारी करण्यात आले आहेत. निवडणुकीची आचारसंहिता लागल्यास कामे ठप्प होऊ नयेत, आणि आठ नऊ आणि दहा मार्चला सलग सुट्ट्याचा विचार करून तातडीने सहा आणि सात मार्च रोजी शासन निर्णय जाहीर केल्याची माहिती आहे. त्याचबरोबर सोमवार, मंगळवार या दोन दिवसांत मंत्रिमंडळाची बैठक घेऊन काही महत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे.