मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांनी रविवारी रात्री शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी सौ.मनीषा वायकर तसेच असंख्य शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी त्यांचे शिंदे गटात स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी शिवसेना खासदार गजानन कीर्तिकर, शिवसेना प्रवक्त्या सौ.शीतल म्हात्रे, माजी नगरसेवक कमलेश राय, उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे संघटक उदय सावंत तसेच शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
सच्चे शिवसैनिक, जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा आमदार, मुंबई महानगरपालिकेचे चार वेळा स्थायी समिती सभापती असलेले रवींद्र वायकर यांनी वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केल्याबद्दल आनंद होत असल्याचे मत यावेळी शिंदे गटाक़डून व्यक्त करण्यात आले.
या प्रवेशामुळे लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाला पुन्हा एकदा जोरदार धक्का बसला आहे. आतापर्यंत ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभे असणारे वायकर एकाएकी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने ठाकरे यांना आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का बसला आहे.जोगेश्वरी भूखंड घोटाळाप्रकरणी ‘ईडी’च्या रडारवर वायकर होते. गेल्या महिन्यात त्यांच्या घरावर ‘ईडी’ने धाड टाकली होती. त्यानंतर त्यांनी हा प्रवेश केला.