नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) –अनोळखी इसमाच्या खुनाची ४ तासांच्या आत उकल केल्याची कामगिरी पंचवटी पोलीस ठाणेचे गुन्हे शोध पथकाने केली. रविवारी पंचवटी पोलीस ठाणे हद्दीत अहिल्याबाई होळकर पुलाजवळ एक ४० ते ४५ वर्षे वयाच्या पुरुषाचा मृतदेह मिळून आला होता. सदर इसमाच्या मृतदेहावरील जखमांवरून व प्राथमिक तपासावरून सदर इसमास कुणीतरी जिवे ठार मारल्याची खात्री झाल्याने पंचवटी पोलीस ठाणेचे पोलिस शिपाई गोपाळ रामभाऊ देशमुख यांचे तक्रारीवरून पंचवटी पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला.
हा गुन्हा दाखल झाल्यानंतर पथकाने गुन्हयाच्या घटनास्थळी येण्या-जाण्याच्या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, दोन संशयीत इसमांनी मयतास गंभीर दुखापत करून जिवे ठार मारल्याबाबत प्रथमदर्शनी दिसुन आले. त्याआधारे पंचवटी पोलीस ठाणेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांचे मार्गदर्शनाखाली सदर संशयीत इसमांबाबत काही एक सुगावा नसतांना पंचवटी पोलीस ठाणेचे अधिकारी व अंमलदार यांनी मानवी कौशल्याचा वापर करून आरोपीतांची ओळख पटविली असता, सदरचा गुन्हा संशयीत सचिन रमेश वनकर याने विधी संघर्षित बालकाचे मदतीने केल्याचे निष्पन्न झाले.
सदरचा गुन्हा अतिशय संवेदनशिल असल्याने गुन्हयातील अज्ञात आरोपीचा तात्काळ शोध घेऊन सदरचा गुन्हा लवकरात लवकर उघडकीस आणणेबाबत संदिप कर्णिक, पोलीस आयुक्त, नाशिक शहर, मोनिका राऊत, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-१, श्री. नितीन जाधव, सहा. पोलीस आयुक्त, पंचवटी विभाग, नाशिक शहर यांनी सुचित केले होते.
असा झाला खूनाचा उलगडा
सदर गुन्हयातील मयत अनोळखी इसमाची ओळख पटवून अज्ञात आरोपींचा शोध घेऊन सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याचे मोठे आव्हान पंचवटी पोलीसांसमोर होते. त्याअनुषंगाने पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी सदर गुन्हयातील आरोपी निष्पन्न होणेकामी पंचवटी पोलीस ठाणेकडील स्वतंत्र पथक स्थापन करून घटनास्थळाच्या आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणे बाबत पथकास सुचना दिल्यानंतर या खूनाचा उलगडा झाला.