नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून लासलगाव येथील ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालयाचे ५० खाटांचे उपजिल्हा रुग्णालयामध्ये श्रेणीवर्धन झाल्याने या श्रेणीवर्धीत अतिरक्त २० खाटांच्या इमारत बांधकामांच्या अंदाजपत्रक व आराखडयांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाकडून १३ कोटी ७६ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून लासलगाव येथील ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाचे ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धीत करण्यास शासनाची मंजुरी मिळालेली होती. या श्रेणीवर्धीत रुग्णालयाच्या अतिरिक्त २० खाटांच्या बांधकामास निधी उपलब्ध होण्यासाठी मंत्री छगन भुजबळ यांचा पाठपुरावा सुरू होता. त्यानुसार सार्वजनिक आरोग्य विभागाकडून १३ कोटी ७६ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
या उपजिल्हा रुग्णालयात सुमारे ४ वैद्यकीय अधिकाऱ्यांसमवेत इतर १३ असा एकूण १७ पदे वाढणार आहे. त्यामुळे परिसरातील रुग्णांना विविध आजारांवर उपचार घेण्यासाठी स्पेशालिस्ट डॉक्टर उपलब्ध होणार आहे. तसेच या उपजिल्हा रुग्णालयात पुढील टप्यात सोनोग्राफीसह इतर यंत्रसामग्री उपलब्ध होऊन नागरिकांना आरोग्याच्या दर्जेदार सुविधा उपलब्ध होणार आहे.
या उपजिल्हा रुग्णालय २० खाटांसाठी स्वतंत्र मजला, अद्ययावत ऑपरेशन थिएटर, लिफ्ट, पिण्याच्या व वापराच्या पाण्यासाठी स्वतंत्र पाईप लाईन, सीसीटिव्ही यंत्रणा, सोलर लाईट, भूमिगत गटार, बायो मेडिकल वेस्ट, संरक्षण भिंत, अंतर्गत रस्ते, पार्किंग, गार्डन, फर्निचर, रेन वॉटर हार्वेस्टिंग व्यवस्था, इलेक्ट्रिकल यंत्रणा यासह विविध कामांचा समावेश असणार आहे. या कामास लवकरच सुरुवात होऊन लासलगाव परिसरातील नागरिकांना दर्जेदार वैद्यकीय सुविधा उपलब्ध होणार आहे.