इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबईः लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. आता ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर आज रात्री शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत वायकर वर्षा बंगल्यावर प्रवेश करणार आहेत. आतापर्यंत ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभे असणारे वायकर एकाएकी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याने ठाकरे यांना आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का बसला आहे.
वायकर यांच्यासोबत स्थानिक शिवसैनिकही शिंदे गटात जाण्याची शक्यता आहे. वायकर यांनी सर्व नगरसेवक, शाखा प्रमुख, विभाग प्रमुखांना तयारीत राहण्यास सांगितले असल्यामुळे ठाकरे गटाला हा मोठा धक्का आहे.
या प्रवेश सोहळ्यामागे ईडीची चौकशी कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. गेल्या महिन्यात त्यांच्या घरावर ‘ईडी’ने धाड टाकत जोगेश्वरीतील कथित घोटाळ्याप्रकरणी चौकशी सुरू केली आहे. खासदार संजय राऊतयांनी काही दिवसांपूर्वी ट्वीट करून, वायकर यांना ‘ईडी’ धमकावत असल्याचा आरोप केला होता. वायकरांवर शिंदे गटात प्रवेश करण्यासाठी दबाव असल्याचे त्यांनी म्हटले होते.